म. टा. प्रतिनिधी, पुणेः ‘सोशल मीडिया हा मीडियाचा एक भाग आहे. त्याला किती महत्त्व द्यायचे. चांगले काम करा आणि त्यासाठी वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक मीडियातून प्रसिद्धी मिळवा. उठसूठ लाइव्ह व्हिडिओ करीत बसू नका. हे जरा गांभीर्याने घ्या,’ अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे कान उपटले.

राज ठाकरे सध्या तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. सोमवारी शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर मंगळवारी राज यांनी उपविभागाध्यक्ष, प्रभागाध्यक्ष, शाखाध्यक्षांशी संवाद साधला; तसेच संलग्न संस्थांच्या अध्यक्षांशीही संवाद साधला. पक्षाच्या माजी नगरसेवकांचीही स्वतंत्र बैठक घेऊन त्यांनाही राज यांनी मार्गदर्शन केले.

यातील एका कार्यक्रमादरम्यान एक कार्यकर्ता लाइव्ह व्हिडिओ करीत असल्याचे लक्षात आल्याने राज यांनी त्याला हटकले. ‘ही पक्षाची बैठक आहे. कशाचे लाइव्ह करायचे, हे तुम्हाला समजते का?’ असा सवाल करून ‘माध्यमांबद्दल जाण ठेवा,’ असा आदेशवजा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. ‘सोशल मीडिया थोड्यापुरता ठीक आहे. लोकांपर्यंत पोहोचायचे असेल, तर वृत्तपत्रे आणि माध्यमांद्वारे बातम्यांमधून तुम्ही पोहोचले पाहिजे. त्याकडे नीट लक्ष द्या,’ असेही राज यांनी सुनावले.

‘राज ठाकरेंनी मंगळवारी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या छातीवर ‘महाराष्ट्र सैनिक’ हा बिल्ला स्वत: लावला. उर्वरित कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांनी हा बिल्ला लावला. लीगल सेलसह पक्षाच्या विविध अंगीकृत संघटनांच्या शहराध्यक्षांशी, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून राज यांनी त्यांच्या अडचणी समस्या समजून घेतल्या. ‘पुढील काळात अधिक जोमाने काम करा. कामातून सर्वांपर्यंत पोहोचा. प्रत्येक घरापर्यंत संपर्क वाढविण्याची सूचनाही त्यांनी केली,’ असे मनसेचे सरचिटणीस किशोर शिंदे यांनी सांगितले.

बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी संवाद
‘दिवसभर झालेल्या पक्षस्तरीय बैठकांनंतर राज ठाकरे यांनी शिवशाहीर महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातील एका लिखाणाविषयी दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली,’ असे मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी सांगितले.

‘रेस्क्यू टीम’ची स्थापना
पावसामुळे होणाऱ्या किंवा इमारत दुर्घटनेसारख्या घटनांमुळे नागरिकांच्या मदतीसाठी मनसेने पुढाकार घेतला आहे. मनसेतर्फे पुण्यात आपत्कालीन व्यवस्थापन पथकाची स्थापना करण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते मंगळवारी झाले. या वेळी मनसेचे नेते हेमंत संभूस यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या पथकात प्रशिक्षित युवक-युवतींचा समावेश असेल. महापालिका-पोलिसांशी समन्वय साधून हे पथक काम करणार आहे, अशी माहिती संभूस यांनी दिली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here