रत्नागिरी – सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यात तब्बल २०४२ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात १ जून ते २० जूलै या कालावधीमध्ये २०४२ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तर मागील २४ तासात जिल्ह्यात १०२ मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. २३ जुलैपर्यंत जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देखील हवामान विभागानं दिला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात ९ तालुके आहेत. या नऊ तालुक्यांमध्ये १ जून ते २० जुलै या कालावधीमध्ये चांगलाच पाऊस झाला आहे. मंडणगडमध्ये २१४८, दापोलीमध्ये १७९१, खेडमध्ये २३१२, गुहागरमध्ये २२६४, चिपळूणमध्ये १७९५, संगमेश्वरमध्ये १९५९ , रत्नागिरी तालुक्यामध्ये २३३४, लांजामध्ये १९५० आणि राजापूर तालुक्यामध्ये १८२५ इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

अद्याप जुलै महिन्याचे १० दिवस देखील बाकी आहेत. शिवाय, मुसळधार पाऊस देखील कोसळण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. आजपासून पुढील दोन दिवस हवामान खात्याने जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. दुपारानंतर पावसाचा दोर आणखी वाढला आहे. गेल्या आठ दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

खेड येथील जगबुडी नदीने व राजापूर येथील कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. यामुळे नद्यांशेजारील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जगबुडी नदीची इशारा पातळी ६ इतकी असून सध्याची पातळी ६.५० इतकी आहे. तर कोदवली नदीची इशारा पातळी ४.९० इतकी असून सध्याची पातली ६.०० इतकी आहे. अशात जर पाऊस आणखी वाढला तर परिसरात पूर येण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरीमध्येही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here