जरंडेश्वर साखर कारखान्यावर सक्तवसुली संचालनालयानं (ED) जप्तीची कारवाई केली आहे. हा कारखाना उपमुख्यमंत्री यांच्या नातेवाईकांचा असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. तसंच, ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्येही चिंतेचं वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर देऊर येथील मेळाव्यात बोलताना शशिकांत शिंदे यांनी जरंडेश्वर कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. ‘जरंडेश्वर कारखाना ही जिल्ह्याची प्रमुख अर्थवाहिनी आहे. १५ लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप करणाऱ्या हा कारखाना जिल्ह्यातील तब्बल ५० हजार शेतकऱ्यांचा आर्थिक आधार आहे. जिल्हा बँकेला सात कोटींचा फायदा मिळवून देणारा हा कारखाना आहे. ऊसाला उत्तम देणारा आणि कामगारांचे पगार वेळेवर देणारा हा कारखाना आहे. अनेकांचे संसार उभे करणारा हा कारखाना राजकारणापायी बंद करण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा शिंदे यांनी दिला.
वाचा:
‘ईडीला जी काही कायदेशीर कारवाई करायची आहे, ती करावी. त्यातून सत्य समोर येईलच, पण कोणत्याही परिस्थितीत हा कारखाना बंद ठेवू नये. यासाठीच हे जनजागृती आंदोलन सुरू आहे. सध्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात, गावागावांत मेळावे घेऊन त्यानंतर एक निवेदन ईडीला देणार आहोत. ईडीनं सकारात्मक भूमिका घेतली तर सहकार्य करू. अन्यथा, रस्त्यावर उतरून विरोध करू. साखर कारखाना बंद राहिला तर किती मोठं नुकसान होतं याची जाणीव आहे. त्यामुळं कारखाना बंद करण्याचा प्रयत्न झाला तर ५० हजार शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असं शिंदे म्हणाले.
वाचा:
‘हा कारखाना ईडीनं चालवावा किंवा सक्षम माणसाला चालवण्यासाठी द्या, अशी मागणी दिल्लीत एका नेत्यानं केली आहे. ज्यांच्यामुळं या कारखान्याचा लिलाव झाला तीच मंडळी आज कारखाना परत मिळवण्यासाठी धडपडत आहेत. काहींनी तर कारखाना परत ताब्यात आल्याचा आनंद साखर वाटून साजरा केला,’ याकडंही शिंदे यांनी लक्ष वेधलं.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times