एकादशीच्या दिवशी उपवासात भाविक मोठ्या प्रमाणात भगर आणि भगरीपासून तयार केलेले वेगवेगळ्या पदार्थांचं सेवन करतात. पाथरी इथंही चतुर्थीसाठी होलसेल दुकानातून भगर खरेदी करून अनेक भाविकांनी भगरीची भाकरी आणि इतर पदार्थ तयार केले. मात्र या पदार्थांचे सेवन केल्याच्या तीन चार तासानंतर अनेक जणांना मळमळ आणि उलट्या होण्यास सुरुवात झाली. वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर हा प्रकार जेवणातून विषबाधा झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर तात्काळ सर्व रुग्णांना पाथरी येथील आरोग्य केंद्रात हलवण्यात आले.
अन्नातील विषबाधेतून रुग्णांना हा त्रास झाल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आल्यानंतर कुठलाही विलंब न करता डॉक्टरांनी औषध उपचार सुरू केले. वेळीच उपचार मिळाल्याने सर्वच रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.
दरम्यान, विषबाधा झालेले सर्वजण पाथरी शहर आणि परिसरातील रहिवासी आहेत. या घटनेनंतर पुन्हा एकदा अन्न आणि औषध प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असून एवढ्या मोठ्या प्रमाणात विषबाधा होऊनही अन्न आणि औषध प्रशासनाकडून साधी दखलही घेण्यात आली नाही. त्यामुळे हा विभाग फक्त नावापुरताच शिल्लक आहे की काय, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, अन्न आणि औषध प्रशासन आणि पोलिस प्रशासन संबंधित दुकानदाराविरोधात काय कारवाई करते, तसेच जिल्ह्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी अन्न व औषध प्रशासन काय पाऊल उचलते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे .
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times