संगमनेर: बाजारात कांद्याचे भाव तेजीत असताना संगमनेरातील एका कांदा व्यापाऱ्याला उत्तर प्रदेशातील दोघांकडून तब्बल १ कोटी ३३ लाखांचा गंडा घालण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमन राजपूत व मनमोहन राजपूत (दोघेही राहणार, ललई, खैरगड, जि. फिरोजाबाद, उत्तर प्रदेश) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यापाऱ्यांची नावे आहेत. याप्रकरणी मनोहर दगडू सातपुते (वय ३८, रा. खांजापूर, सुकेवाडी शिवार, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, महिन्याभरापूर्वी बाजारात कांद्याचे भाव तेजीत असताना आरोपी अमन आणि मनमोहन राजपूत यांनी सातपुते यांच्याकडून २५ जानेवारी ते ११ फेब्रुवारी २०२० दरम्यान १ कोटी ३३ लाखांचा कांदा खरेदी केला. त्याचा मोबदला म्हणून व्यापाऱ्यांनी वरील रकमेचा धनादेश सातपुते यांना दिला. परंतु व्यापाऱ्याने दिलेला धनादेश बँकेत वटला नसल्यामुळे सातपुते यांनी राजपूत यांना फोन केले असता त्यांचा फोन बंद होता. आपल्याकडून कांदे खरेदी करून त्याबदल्यात पैसे न देता फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर सातुपते यांनी वरील दोघांविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि कलम ४२०, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here