नवी दिल्लीः नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून (CAA) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवर काँग्रेस आक्रमक झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सीएए, एनपीर आणि एनआरसीबद्दल अधिक समजवण्याची गरज आहे, असं म्हणत माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस प्रवक्ते मनिष तिवारी यांनी निशाणा साधलाय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची शुक्रवारी भेट घेतली. या भेटीनंतर वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. सीएएमुळे कुणीही घाबरू नये, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारची भूमिका उचलून धरली. यामुळे काँग्रेसची कोंडी झालीय. ही कोंडी फोडण्यासाठी आता काँग्रेसकडून प्रयत्न होताना दिसत आहे.

‘उद्धव ठाकरे यांना नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत अधिक समजावून सांगण्याची गरज आहे. आणि एनपीआरचा (राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी ) आधारच एनआरसी (राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी) आहे. एनपीआर फाइल केलं तर एनआरसीला रोखता येणार नाही, असं मनिष तिवारी म्हणाले. तसंच धर्माच्या आधारावर नागरिकत्व देणं हे घनाबाह्य आहे, हे उद्धव ठाकरे यांनी लक्षात घेतलं पाहिजे’, असं तिवारी यांनी सांगितलं.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) कुणालाही देशाबाहेर काढण्यासाठी करण्यात आलेला नाही. ज्या लोकांनी सीएएविरोधी आंदोलन भडकविले आहे त्यांना त्याची जाणीव असायला हवी. सीएएच्या विरोधात दिल्लीत आंदोलन सुरू असून, आंदोलकांना भडकविण्याचे काम कोण करीत आहे हे तुम्हाला ठाऊक आहे, अशा शब्दांत दिल्लीभेटीवर गेलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतचा आपला आक्षेप नोंदवला.

सीएए, एनपीआर, एनआरसी या विषयांवर माझी पंतप्रधानांशी चर्चा झाली. हे तिन्ही मुद्दे समजून घेऊन मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. एनआरसी पूर्ण देशात लागू केला जाणार नाही, असे केंद्रानेच संसदेत स्पष्ट केले आहे. एनआरसी आसामपर्यंत मर्यादित आहे आणि तिथे काय चालले आहे, ते सर्वांनाच ठाऊक आहे. जनगणना आणि एनपीआर दर दहा वर्षांनी होतात. या तिन्ही मुद्यांबाबत मी राजकीय भूमिकेच्या आधारे नव्हे, तर उपलब्ध माहितीच्या आधारे बोलत आहे, असे ते म्हणाले. एनआरसी केवळ मुसलमानांसाठीच धोकादायक आहे, असे वातावरण निर्माण केले जात असले तरी सर्वांनाच रांगेत लागून आपले नागरिकत्व सिद्ध करावे लागणार आहे. पण एनआरसी लागू होणारच नसल्यामुळे हा प्रश्नच उद्भवत नाही, अशी पुस्ती त्यांनी जोडली.

एनपीआरच्या विषयावर आज ना उद्या सारी माहिती येईल आणि त्यातील आक्षेपार्ह रकाने आणि कलमे पाहून ते आम्हाला मान्य नाही असे आम्ही म्हणू शकतो, अशा शब्दात त्यांनी आपली या वादग्रस्त मुद्यांवर आपले म्हणणे मांडले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here