कोल्हापूर जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं असून पूरस्थितीचा धोका निर्माण झाला आहे. नदीचे पाणी इशारा पातळीकडे जात असून जिल्ह्यातील ७७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. अनेक घरात पाणी घुसल्यामुळे परिस्थिती गंभीर होण्याच्या शक्यतेने एनडीआरएफच्या दोन तुकड्या कोल्हापुरात दाखल होत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात गेले तीन दिवस पाऊस सुरू आहे. बुधवारी रात्रभर पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. या मुसळधार पावसामुळे नद्यांचे पाणी पात्राबाहेर आले आहे. बहुतेक सर्व धरणे भरत आली असून धरणातून बाहेर पडणाऱ्या पाण्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे . यामुळे अनेक रस्तेही बंद झाले आहेत. कोल्हापूर ते गगनबावडा, मलकापूर ते रत्नागिरी हे प्रमुख राज्य महामार्ग रात्री पासून बंद झाले आहेत. या महामार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आले आहे.
पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून सध्या या पाण्याची पातळी ३७ फुटांपर्यंत पोहोचली आहे. ३९ फुटांवर पाणी पोहोचल्यास धोक्याचा इशारा समजला जातो. त्रेचाळीस फुटावर पाणी गेल्यास महापुराचा धोका निर्माण होतो. यामुळे पाणी इशारा पातळीकडे निघाल्याने जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पंचगंगा नदीचे पाणी कोल्हापूर शहरात आलं आहे. शहरात रामानंदनगर येथे जयंती नाल्याचे पाणी अनेक घरात घुसले आहे. जरगनगरकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे.
जिल्ह्यातील ओढे आणि नाले तुडुंब भरून वाहत आहेत. जिल्ह्यातील जवळजवळ ५० पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. आज दिवसभरही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
आणखी वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times