रायगडः मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या पावसानं रायगड जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. महाड शहरात मुसळधार पावसामुळं पूरस्थिती निर्माण झाली आहे. महाड शहराला पुराचा वेढा पडला असतानाच शहरात पुराचा पहिला बळी गेला आहे. गच्चीवरुन पुराच्या पाण्यात पडल्यामुळं एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. (Maharashtra Rain Update)

महाड शहरात सावित्री नदीचे पाणी शिरल्यामुळं अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तर बाजारपेठेतही पाणी शिरले आहे. त्यातच पुराचं पाणी गच्चीवरुन पाहताना तोल जाऊन एक व्यक्ती पुराच्या पाण्यात पडला असल्याची माहिती आहे. महाडच्या रोहिदास नगर भागात ही घटना घडली आहे. इमारतीच्या गच्चीवरुन ते पुराच्या पाण्याचा अंदाज घेत असताना ही घटना घडली आहे. महाडमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

वाचाः

कोकणातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यानं रायगडसह चिपळूण, राजापूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. महाडमध्येही बाजरपेठेत आठ ते दहा फुटांवर पाणी साचले आहे. तटरक्षक दलाची २ पथकं महाडकडे रवाना झाली आहेत. कोलाड येथील महेश सानप यांचे पथकही महाडला रवाना झाले आहे. सावित्री नदीचे पाणी शहरात आल्यानं अनेक सखल भागात पाणी शिरले आहे. रायगडमध्ये गेल्या २४ तासांत १६५. १८ मिमि पावसाची नोंद झाली आहे. तर, महाडमध्ये २०७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

वाचाः

चिपळूणमध्ये हाहाकार

कोकणात जगबुडी नदीने रौद्र रुप धारण केल्यानं यंदा खेड शहर बाजारपेठे येथे पुराचे पाणी शिरले आहे. नदीकाठी असलेल्या नागरिकांना शाळेत व अंगणवाडी येथे सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तसंच, शासनाच्या आपत्कालीन यंत्रणेकडून मदत कार्य करण्यासाठी शहरात पथक कार्यरत आहे. चिपळूण शहरात अनेक ठिकाणी पुराचे पाणी भरल्याने २००५ ची पुनरावृत्ती झाल्याची स्थिती आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चिपळूण-कराड मार्गे चिपळूण-मुंबई मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

वाचाः

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here