मंगरुळपीर तालुक्यातील सावरगाव कान्होबा इथं नदीचं पाणी शेतात शिरल्यानं उभ्या पिकासह शेती खरडून गेली आहे. सावरगाव येथील अनेक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. संपूर्ण सोयाबीन पीक पाण्यात गेलं आहे. पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेतीला तलावाचं स्वरूप आलं आहे. मंगरुळपीर तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या वटफळ आणि कुंभी गावाशेजारी असलेल्या पाझर तलावाला मोठं भगदाड पडलं आहे. त्यामुळं पाझर तलावाखाली असलेली शेती खरडून गेली आहे. या तलावातील पाणी पूस नदीमध्ये जात असल्यानं कोणत्याही गावाला याचा फटका बसला नाही. मात्र, शेतीचं नुकसान झालं आहे.
वाचा:
मानोरा तालुक्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. पूस नदीला पूर आला असून नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळं ग्रामीण भागातील रस्ते पाण्याखाली गेले असून रुई, गोस्ता ते वटफळ या गावांचा संपर्क तुटला आहे. दुसरीकडे भंडारी, राजना, ब्राम्हणवाडा गावचाही संपर्क तुटला आहे. अनेक ठिकाणी शेतात पाणी शिरल्यानं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. जिल्हा प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times