राज्यात बुधवारी रात्रीपासून पावसानं जोर धरला आहे. पुण्यातही धरणक्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे. मुळशी धरण पाणलोट क्षेत्रातही काल ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं ताम्हिणी घाटात २४ तासात ४६८ मीमी पावसाची नोंद झाली आहे. तर, खडकवासला धरणातही आज दुपारी तीनपर्यंत १. ७५ टीएमसी (८८.५२%) पाणीसाठा झाला आहे. धरण क्षेत्रात होणाऱ्या संततधार पावसामुळं आज खडकवासला धरणातून २ हजार ४६६ क्युसेक वेगाने विसर्ग करण्यात येणार आहे. त्यानंतर विसर्ग वाढण्याची शक्यता आहे.
खडकवासला धरणात वेगानं पाण्याची आवक होत असून पावसाचा जोर कायम राहिल्यास आज संध्याकाळी धरणातून मुठा पात्रता पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. ‘खडकवासल्या’वरील तीनही धरणे अजून भरलेली नसल्याने विसर्ग तुलनेने कमी असेल, तरीही आपण सर्वांनी काळजीच घेतलेली बरी, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा हा जास्त झाला आहे. गेल्या वर्षी ९.६१ टीएमसी पाणीसाठा होता. धरण परिसरात पावसाचा जोर कायम आहे. मंगळवारी चारही धरणांमध्ये ११.५५ टीएमसी पाणीसाठा होता. बुधवारी दिवसभर संततधार होती. त्यामुळे पाणीसाठा हा १२.८३ टीएमसी झाला आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये सुमारे दोन टीएमसी पाणीसाठा वाढला आहे.
मुळशी धरणक्षेत्रात पावसाची संततधार
मुळशी धरणामध्ये आज सकाळी ७:०० ते दू. ४:०० पर्यंत ताम्हीणी घाटात (दावडी) ३१५ मीमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या ८-९ तासात एकूण ४१ दलघमी (१.४७ टीएमसी) आवक नोंद झाली आहे. दुपारी ४:०० वा. मुळशी धरण जलाशय पातळी ५९८.९८ मी, साठा २५९.२४२ दलघमी आणि टक्केवारी ४५.४२%. इतकी आहे.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times