रत्नागिरीः तळकोकणात ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने चिपळूण खेड संगमेश्वर राजपुरमध्ये महापुर आल्याने हाहाकार उडाला असुन कोकण ठप्प झाले आहे. महामार्ग व कोकण रेल्वे सुध्दा बंद पडली असून संगमेश्वर बावनदी पासुन चिपळूणपर्यंत पोहोचणे अवघड व धोकादायक बनले असतानाच चिपळूणला पुराच्या पाण्याचा विळखा बसला आहे. सारे चिपळूण जलमय झाले आहे. सुमारे पाच हजार चिपळूणकरांना आपापल्या घरे, इमारतींमध्ये अडकून पडावे लागले असुन या सर्वानी मदतीसाठी टाहो फोडला आहे. मात्र त्यांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी सायंकाळ होई पर्यंत कोणतीही यंत्रणा प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याने सारे प्रतीक्षा करत होते.

बचाव कार्यांसाठी चिपळूण नगरपालीकेच्या दोन बोटी तैनात झाल्या असुन रत्नागिरीमधुन पोलिस व कोस्ट गार्डकडच्या दोन बोटी पोहोचत आहेत. पुण्याहून एनडीआरफची दोन पथकं चिपळूण, खेडसाठी मागवण्यात आली आहेत. चिपळूण शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे दोन बळी गेल्याची प्राथमिक माहिती आहे. एक महिला पाण्यात बुडाली असुन दुसरी वाहून गेली असे सांगण्यात येते. एकविरा मंदिर भागात राहणाऱ्या एका कुटुंबाला पुराच्या पाण्यातुन बाहेर काढताना वृध्द महिलेचा बुडून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. तर, रत्नागिरी जवळील टेंबे बौध्द वाडी येथे निघालेली आशा प्रदिप पवार या महिलेचा पऱ्याच्या पाण्यात वाहून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी सात वाजता घडली आहे. सदर महिला करोना लसीचा डोस घेण्यासाठी चांदेराई प्राथमिक आरोग्य केंद्रात जात होत्या. मात्र, यावेळी पऱ्याला पुराचे पाणी आल्याने पऱ्या ओलांडताना ही घटना घडली आहे.

चिपळूणमध्ये पुराची भीषण परिस्थीती ओढवली असुन संपूर्ण चिपळुण शहर खेर्डी, कळंबस्ते, परिसर पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रात्रभर झालेल्या ढगफुटीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली असुन वशिष्ट व शीवनदीला आलेल्या पुरामुळे चिपळूण जलमय झाले आहे. अंतर्गत रस्त्यांवर तब्बल आठ फुटपाणी भरलेले असल्याने बंद झालेले आहेत. बाजारापेठा व शेकडो घरांमध्ये पाणी शिरले आहे. मुंबई-गोवा महामार्ग, कराड रोड मार्गावरील वाहतूक सुध्दा ठप्प झाली आहे.

रस्त्यावरील बहाद्दुर शेख पुल वहातुकीसाठी बंद झाला आहे. अनेक घरांच्या छप्परांपर्यंत पाणी आल्याने शेकडो घरांची परस्थिती बिकट बनली आहे. हजारो लोक मदतीच्या प्रतीक्षेत असून अजूनही त्यांच्या पर्यंत मदत यंत्रणा पोहोचलेली नाही. शहरातील जुना बाजारपुल,बाजारपेठ, जुने बसस्टॅड, चिंचनाका, मार्कंडी, बेंदरकर आळी, मुरादपुर रोड,एसटी स्टँड, भोगाळे व परशुराम नगर जलमय झाला. असुन घरे पाण्याखाली गेली आहेत. साप व मगरींच्या संचारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. संगमेश्वर बाजारपेठेत, आठवडा बाजार, राम पेठ रोड, गणपती मंदिराजवळ, गदेवखार, भीडे वखार आदी भागात शास्त्री नदीमुळे पुरस्थीती निर्माण झाली असुन नदीकाठच्या घरातुन नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले

अतिवृष्टी, हायटाईड आणी कोयनेचे पाणी सोडल्यामुळे वशिष्ट नदीला पुर आला, असे आता चिपळूणकरांचे म्हणणे आहे. वाशीष्टी नदीवरील रेल्वेच्या पुलाला पाणी लागले होते. पुराचा धोका लक्षात येताच कोकण रेल्वे प्रशासनाने रेल्वे थांबवण्याचा निर्णय घेतल्यामुळं विविध स्थानकांवर रेल्वे थांबवून ठेवण्यात आल्या आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here