मुंबई: अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला असून कर्नाटक पोलिसांचं एक पथक पुजारीच्या मुसक्या आवळण्यासाठी सेनेगलमध्ये दाखल झालं आहे. पुजारीच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सध्या पूर्ण केली जात असून लवकरच त्याला घेऊन पोलीस भारतात परततील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

रवी पुजारीने प्रत्यार्पणास आव्हान देणारी याचिका सेनेगलच्या सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावल्याने पुजारी कचाट्यात आला आहे. या घडामोडींनंतर पुजारीला भारतात आणण्याच्या हालचालींना वेग आला असून भारताच्या मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांच्या यादीतील हा गँगस्टर भारताच्या हातात येणार आहे. रवी पुजारीच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

रवी पुजारी हा अँथोनी फर्नांडीस या नावाने वावरत होता. सेनेगलमधील तपास यंत्रणांच्या लेखी याच नावाची नोंद होती. बुर्किना फासो या देशाचा पासपोर्ट त्याच्याकडे होता. रवी पुजारीचे आधी थायलंड, मलेशिया, मोरोक्को यात देशात बस्तान होते तर नंतर पश्चिम आफ्रिकेतील बुर्किना फासो, कोंगो रीपब्लिक, गिनी, आयव्हरी कोस्ट आणि सेनेगल या देशांत त्याने आपला मुक्काम हलवला. गेल्या आठ वर्षांत पुजारीने सेनेगलमध्ये अनेक हॉटेल्स उभारली. सेनेगलची राजधानी डकारमध्ये जवळपास गेल्या दशकभरापासून तो पत्नी, मुलांसह राहत असून अत्यंत आलीशान जीवन जगत आहे. २१ जानेवारी २०१९ रोजी पुजारीला एका हेअर कटिंग सलूनधून त्याला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून त्याला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू असून या प्रयत्नांना यश येऊन लवकरच पुजारी भारताच्या ताब्यात येणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरातमध्ये अनेक गुन्हे

रवी पुजारीवर कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये खंडणी व अन्य अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. कर्नाटकात बेंगळुरूमध्ये ३९, मंगळूरमध्ये ३६, उडुपीमध्ये ११ तर म्हैसूर, हुबळी-धारवाड, कोलार आणि शिवमोगामध्ये प्रत्येकी एक गुन्हा पुजारीविरुद्ध दाखल आहे. महाराष्ट्र मुंबई पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये पुजारीविरुद्ध ४९ गुन्ह्यांची नोंद आहे. त्यातील २६ गुन्हे मकोकाखाली दाखल झालेले आहेत. गुजरातमध्ये त्याच्याविरुद्ध खंडणी प्रकरणी ७५ गुन्ह्यांची नोंद आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here