नवी दिल्लीः भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी पाकव्याप्त काश्मीरसंदर्भात महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. काश्मीरमधील कलम ३७० रद्द करणं हे अखंड भारताच्या उद्देशाचं पहिलं पाऊल होतं. आता पुढचं पाऊल हे पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्याचं आहे, असं राम माधव म्हणाले. विज्ञान भवनात आयोजित छात्र संसदेत ते बोलत होते.

अखंड भारताचे स्वप्न कधी साकार होईल? असा प्रश्न एका विद्यार्थ्यांनी छात्र संसदेत राम माधव यांना केला. त्याला राम माधव यांनी उत्तर दिले. हे स्वप्न एकदम नव्हे तर टप्प्या टप्प्याने पूर्ण होईल. पहिली गोष्ट म्हणजे जम्मू-काश्मीर हे आतापर्यंत मुख्य प्रवाहात नव्हते. ते राज्य आता कलम ३७० रद्द झाल्याने देशाशी जुळले गेले आहे. आता पुढले लक्ष्य हे भारतीय जमीन परत मिळवण्याचं आहे. ही जमीन जी अवैधरित्या पाकिस्तानच्या ताब्यात आहे. आणि पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याचा प्रस्ताव संसदेत १९९४मध्ये मंजूर करण्यात आला होता, असं राम माधव यांनी सांगितलं.

२०व्या शतकातील भारत हा नुकताच स्वतंत्र झाला होता. स्वातंत्र्यानंतरची स्वप्न पूर्ण करण्याची त्यावेळी जबाबदारी होती. मात्र हे २१ शतक आहे. आजची पिढी महत्त्वाकांशी आणि व्यवहारीक आहे. कारण ही पिढी तरुणांची आहे, असं राम माधव म्हणाले.

पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग आहे आणि लवकरच तो भारताचा भौगोलिक भाग असेल, असं यापूर्वी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकरही बोलले होते. तसंच नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावेळी संसदेत चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहाही पाकव्याप्त काश्मीर भारताचेच आहे, असं म्हटले होते. तिथले नागरिक आपले आहेत. आपण अजूनही जम्मू-काश्मीर विधानसभेतील २६ जागा राखून ठेवतो. पाकव्याप्त काश्मीरसाठी बलिदान देण्याचीही आमची तयारी आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीनचाही समावेश होते, असं अमित शहा कलम ३७० रद्द करतेवेळी संसेदत म्हणाले होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here