ते शेतकरी नाहीत, तर मवाली आहेत. त्यांची दखल घेतली पाहिजे. हे गुन्हेगारी कृत्य आहे. जे काही २६ जानेवारीला घडलं ते लज्जास्पद होतं. ते गुन्हागारी कृत्य होतं. विरोधकही त्यांना समर्थन देत आहेत, असं वक्तव्य मिनाक्षी लेखी यांनी गुरुवारी केलं. कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून लेखी यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला हे उत्तर दिलं. यावर लेखी म्हणाल्या, ‘तुम्ही पुन्हा त्यांना शेतकरी म्हणत आहेत, ते मवाली आहेत.’ शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी गेलेल्या एका वृत्तवाहिनीच्या कॅमेरामनला आंदोलकांकडून मारहाण झाल्याचा आरोप आहे. या मारहाणीवर मिनाक्षी लेखी यांनी ही प्रतिक्रिया दिली.
मिनाक्षी लेखी यांच्या वक्तव्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली. मिनाक्षी लेखी यांनी आपल्या वक्तव्यावरून माफी मागितली पाहिजे, असं काँग्रेस नेते मुकेश शर्मा म्हणाले. शर्मा यांनी ट्वीट केलंय. लाज वाटायला हवी. मिनाक्षी लेखी जी शेतकरी मवाली नाही तर अन्नदाता आहेत. यामुळे त्यांची माफी मागा अन्यथा राजीनामा द्या, अशी मागणी शर्मा यांनी केली.
दरम्यान, वाढता वाद पाहता केंद्रीय मंत्री मिनाक्षी लेखी यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. आपल्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. शेतकऱ्यांना उद्देशून आपण वक्तव्य केलेलं नाही. तरीही आपल्या वक्तव्याने कुणीची मनं दुखावली गेली असतील, तर मी माझे शब्द मागे घेते, असं मिनाक्षी लेखी म्हणाल्या.
लेखींच्या वक्तव्यावर शेतकरी नेते टिकैत यांच्याकडून खेद
केंद्रीय मंत्री मिनाक्षी लेखी यांच्या वक्तव्यावर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी खेद व्यक्त केला. लेखी यांच्याकडून अशा वक्तव्याची अपेक्षा नव्हती. कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणारे मवाली नाहीत तर शेतकरी आहेत. शेतकऱ्यांबद्दल असं बोलायला नको. शेतकरी देशाचे अन्नदाता आहेत, असं राकेश टिकैत म्हणाले.
केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत जंतर-मंतरवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. एकावेळी २०० शेतकऱ्यांना आंदोलनाची परवानगी देण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांकडून आंदोलनाच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times