कानाचक सेक्टरमध्ये एक पाकिस्तानी ड्रोन पाडल्याची माहिती जम्मू पोलिसांकडून देण्यात आलीय. पोलिसांच्या दाव्यानुसार, या ड्रोनसोबत आयईडीचे अनेक तुकडे सापडले आहेत. ड्रोनमध्ये आयईडी किती प्रमाणात होतं याचा अद्याप तपास सुरू आहे.
उल्लेखनीय म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून जम्मूतील पाकिस्तानी बाजुला अनेकदा संशयास्पद ड्रोन तसंच फ्लाईंग ऑब्जेक्टस् आढळून येत आहेत. पाकिस्तानच्या दहशतवाद्यांकडून अशा पद्धतीचा घातपाताच कट रचला जात असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केलीय.
आयईडीची वाहतूक करण्यासाठी किंवा एखाद्या ठराविक ठिकाणी घातपात घडवून आणण्याासाठी या ड्रोनचा वापर केला जाऊ शकतो. परंतु, ड्रोन हल्ल्यांपासून संरक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या रणनीतीमुळे हे ड्रोन आयईडी ठराविक ठिकाणी पोहचवण्याच्या अगोदरच नष्ट केले जात आहेत.
ड्रोन हा सुरक्षा व्यवस्थेसाठी मोठा धोका आहे, असं जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक (DGP) दिलबाग सिंह यांनी नुकतंच म्हटलं होतं. दहशतवाद्यांना आर्थिक मदत, दारुगोळा आणि हत्यारं यांचा पुरवठाही या ड्रोनमार्फत केला जातोय.
जम्मूमध्ये भारतीय हवाईदलाच्या तळावर ड्रोन हल्ल्याबद्दल बोलताना हे ड्रोन पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून आले असल्याची माहिती देण्यात आली होती. पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय सीमा भारतीय हवाईदलाच्या तळापासून जवळपास १४ किलोमीटर अंतरावर आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times