नाशिक: ‘सीएए’ कायद्यामुळे जिवंतपणी यातना भोगाव्या लागत असून, करोना व्हायरसमुळे माणसांचे जीव जात आहेत; पण करोनापेक्षा ‘सीएए’ गंभीर असल्याची टीका ‘सादिकबाग’ या आंदोलनात करण्यात आली. केंद्र सरकार जाणीवपूर्वक या कायद्याविरोधातील आवाजाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे सीएए, एनआरसी विरोधातील लढाई अधिक बुलंद करण्याची गरज असल्याचा सूर ईदगाह मैदानावरील सादिकबाग ठिय्या आंदोलनात व्यक्त झाला. यावेळी शाहीनबाग येथील महिलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासह केंद्र सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली.

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (एनआरसी) विरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शाहीनबागप्रमाणे शहरात शनिवारपासून (दि. २२) ‘सादिकबाग’ आंदोलन सुरू झाले आहे. संविधान बचाओ एकता समितीतर्फे आयोजित आंदोलनात सकाळी अकरा वाजेपासून शेकडो महिलांनी ठिय्या दिला आहे. कुराण पठणाने आंदोलनाला प्रारंभ झाला. यावेळी ‘हैं हक्क हमारा आझादी’, ‘हम लेके रहेंगे आझादी’, ‘चप्पा चप्पा गुंज उठेगा इन्कलाब के नारो से’, ‘हिंदुस्थान जिंदाबाद’, ‘तुम्हारी लाठी से तेज हमारी आवाज हैं’, ‘हम लढेंगे, हम जितेंगे’,’हम एक हैं’, ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘संविधान जिंदाबाद’, ‘मजहब नहीं सिखाता, आपस में बैर रखना हिन्दी हैं हम वतन हैं हिन्दोस्ता हमारा’, अशी घोषणाबाजी करण्यात आली.

पदवीधरांचे प्रमाणपत्र तपासून त्यांना नोकरी देण्यापेक्षा स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय रहिवासाचे दस्ताऐवज मागण्यात केंद्र सरकारला अधिक रुची आहे. रोजगार आणि देशातील इतर समस्यांकडे मुद्दाम दुर्लक्ष करून ‘सीएए’चा मुद्दा पुढे केला जात असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. हाती तिरंगा घेऊन महिला आंदोलनात सहभागी झाल्या. जुने नाशिकसह वडाळा गाव, सिडको, सातपूर, नाशिकरोड भागातील चिमुकल्यांसह ज्येष्ठ मुस्लिम महिलांपर्यंत शेकडो आंदोलकांचा सहभाग आहे. सायंकाळी उशिरापर्यंत हे आंदोलन सुरूच होते. आणखी किती दिवस महिलांचा ठिय्या असेल, याबाबत निश्चित सांगण्यात आलेले नाही. पोलिसांनी आंदोलनासाठी चोख बंदोबस्त ठेवला असून, मैदानात महिला पोलिसांचे पथक तैनात आहे. तर, बाहेर वाहतूक कोंडी होऊ नये वाहतूक पोलिसांचाही वॉच ठेवण्यात आला आहे.

हे षडयंत्र!

जुने नाशिक येथील महिलांच्या मदरशातील विद्यार्थिनीने आपले मत आंदोलनात व्यक्त केले. आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदानकार्ड, पासपोर्ट हे भारतीय असल्याचे पुरावे असूनही आता नव्याने पूर्वजांचा रहिवास असल्याचे पुरावे मागणे, हे षडयंत्र आहे. यामुळे सर्वधर्म समभाव असलेल्या हिंदुस्थानातच आपण आहोत ना, हा प्रश्न पडत असल्याचे ती म्हणाली.

प्रवासासह आरोग्यसेवा

‘पीर महेबूब सुब्हानी साहब वक्फ ट्रस्ट’च्या धर्मार्थ दवाखानातर्फे ठिय्या आंदोलनासाठी मोफत वैद्यकीय सेवा ईदगाह मैदानात देण्यात येत आहे. शिवाय आंदोलनकर्त्यांसाठी जेवण, पाणी आणि नाश्त्याची सोय केली आहे. यासह महिलांना मैदानात पोहोचणे सोयीस्कर व्हावे म्हणून, विविध भागातून मोफत रिक्षा आणि बससेवा देण्यात आली. दुपारी अडीचपर्यंत महिला विविध भागांतून गटागटाने आंदोलनात सहभागी होत होत्या. यामुळे दुपारनंतर आयोजकांना मंडप वाढवावा लागला.

म्हणून, ‘सादिकबाग’

जुने नाशिक भागातील भद्रकाली परिसरात असलेली बडी दर्गा ही हजरत पीर सय्यद सादिक शाह हुसैनीबाबा यांची दर्गा आहे. या दर्गाचा इतिहास शेकडो वर्षांपूर्वीचा असून, हुसैनीबाबा यांचा जन्म मदिना शरीफ (हज) येथे झाला. बादशहा जहाँगीर यांच्या काळात म्हणजेच सुमारे पाचशे वर्षांपूर्वी हुसैनीबाबा नाशिकमध्ये आले. त्यांच्या भूमीत आंदोलन होत असल्याने ‘सादिकबाग’ असे नाव देण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here