रत्नागिरी : देशात दरवर्षीचा विचार केला तर सर्वाधिक पाऊस मेघालयातील चेरापुंजी येथे झाला आहे. यानंतर महाबळेश्वरचा नंबर लागतो. मात्र, यावर्षी रत्नागिरी सर्व रेकॉर्ड मोडून काढले. रत्नागिरी जिल्ह्याने महाबळेश्वरलाही मागे टाकले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हंगामाच्या पहिल्याच टप्प्यात २१ जुलैपर्यंत रत्नागिरीत सरासरीपेक्षा सुमारे १,२०० मिलिमीटर अधिक पावसाची नोंद झाली आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाने देशातील पावसाची महत्त्वाची ठिकाणे आणि प्रमुख शहरांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील पावसाने महाबळेश्वरला मागे टाकून दुसरे स्थान पटकावले आहे. देशात मेघालय आणि आसामच्या काही विभागांमध्ये दरवर्षी मोठ्या पावसाची नोंद होते. चेरापुंजीमध्ये पडणाऱ्या पावसाने आजवर विक्रम केला आहे. त्यामुळे चेरापुंजी हे सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण गणले गेले आहे.

मात्र, २०१७ ते २०१९ या तीन वर्षांत महाबळेश्वर आणि पुणे जिल्ह्यातील ताम्हिणी घाटक्षेत्रात पावसाचे प्रमाण जास्त राहिले आहे. तर २०१८ आणि २०१९ या सलग दोन वर्षांत महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली होती. मात्र, २०२० मध्ये महाबळेश्वरचा पाऊस तिसऱ्या क्रमांकावर जाऊन चेरापुंजीत पुन्हा पहिल्या क्रमांकाचा पाऊस नोंदवला गेला आहे. कर्नाटकातील होनावर त्यावर्षी दुसऱ्या क्रमांकावर होते.

यावर्षी तौक्ते चक्रीवादळापासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने चेरापुंजीनंतर सर्वाधिक पावसाची नोंद केली आहे. हंगामाच्या पहिल्याच टप्प्यात २१ जुलैपर्यंत रत्नागिरीत सरासरीपेक्षा सुमारे १,२०० मिलिमीटर अधिक पाऊस झाला आहे. चेरापुंजी मात्र अद्याप पावसाची सरासरी पूर्ण करू शकलेले नाही. रत्नागिरीत जिल्ह्यातील हर्णै (ता. दापाेली) येथे १ जूनपासून २,५०० मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला असून, तो सरासरीपेक्षा १,३०० मिलिमीटरने अधिक आहे. महाबळेश्वरमध्ये सरासरीच्या तुलनेत कमी २,२०० मिलिमीटर पाऊस झाला आहे.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here