गुरुवारी रात्री झालेली अतिवृष्टी व महाबळेश्वर डोंगरमाथ्यावरून आलेल्या पाण्याच्या लोंढ्यामुळे महाड तालुक्यातील तळीये तर पोलादपूर तालुक्यातील केवनाळे व गोवले सुतारवाडी येथे दरडी कोसळून सुमारे ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. तळीये येथे दरडीखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे तर केवनाळे व गोवले सुतारवाडी येथे काही घरे दरडी सोबत वाहत गेली आहेत. केवनाळे व सुतार वाडी येथे २१ जण जखमी आहेत. (Landslide in Mahad, Poladpur of Raigad district)
महाड तालुक्यातील तळीये या गावात सायंकाळी दरड कोसळल्यामुळे गावातील घरे दरडीखाली दबली गेली. आज दरडी खालून ३६ मृतदेह काढण्यात आले आहेत तर सुमारे ४० जण दरडीखाली अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. महाड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच महाबळेश्वर व वरंधा घाट डोंगर भागातील पावसाच्या पाण्याचा लोंढा महाड तालुक्यात आल्याने महाड शहरासह परिसरात परिसरातील गावांमध्ये पूर आला. तळीये हे गाव डोंगरकपारीत वसलेले असल्याने गावातील घरे दराडीच्या खाली दबली गेली. तळीये हे गाव सुमारे ३५ घरांचे असून गावातील लोकसंख्या ८०० च्या आसपास असल्याचे सांगण्यात येते. अतिवृष्टीमुळे या भागातील वीज पुरवठा बंद होता तर पुराचे पाणी सर्वत्र पसरल्याने गावापर्यंत पोहोचण्यासाठी रस्त्याचा माग काढणे देखील अवघड होते. यामुळे या भागात तातडीने बचाव पथक वा मदत पोहोचू शकली नाही. गावातील एक दोन घरे सोडली तर उर्वरित घरांचे बांधकाम कच्चे आहे. सामान्य मजूर व शेतकऱ्यांची वस्ती असलेल्या या गावातील निष्पाप जीवाचा अतिवृष्टीने बळी घेतला असून कालपर्यंत अस्तित्वात असलेल्या या गावाला स्मशानकळा आली आहे. गावापर्यंत बिरवाडी, राजेवाडी व खरवली या तीन मार्गाने जाता येत होते. मात्र अतिवृष्टीमुळे पूरस्थिती असल्याने तिन्ही मार्ग बंद असल्याने तळीयेकरांची सुटका करणे कठीण झाले होते. पुराचे पाणी ओसरल्यानंतर एनडीआरएफ व इतर बचाव पथके गावापर्यंत पोहोचली, मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. यापूर्वी १९९४ मध्ये याच गावानजीकच्या डोंगरकपारीत बसलेल्या पारमाची या गावावर दरड कोसळून अनेक जण दगावले होते तर २००५ मध्ये आलेल्या पुरात महाड तालुक्यातील जुई, दासगाव, कोंडवित, रोहन या गावातील या गावांतील लोक दरडी कोसळल्याने दगावले होते.
वाचा:
पोलादपूर तालुक्यातील गोवेले ग्रामपंचायत हद्दीमधील सुतारवाडी येथे गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन कोसळलेल्या दरडीखाली सुमारे १६ घरांचे नुकसान झाले असून आणखी काही घरे दरडीसोबत उतारावर वाहून गेली आहेत. येथील ६ जणांचा मृत्यू झाला तर १३ जण जखमी झाले आहेत. तर केवनाळे येथील सहा जणांचा मृत्यू तर आठ जण जखमी झाले आहेत.
कापडे ते कामथे बोरघर रस्त्यावरील कापडे बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरील खांबेश्वरवाडीला जोडणारा पूल अर्धा मधोमध तुटून वाहून गेला होता तर साखर बोरज येथील पुलदेखील तुटून वाहून गेल्याने गोवेले गावाकडे कोणत्याही प्रकारचे मदतकार्य पोहोचविणे प्रशासनास शक्य झाले नव्हते. अखेर त्रिवेणी संगम मार्गे जखमींना पोलादपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले गेले. मृतांवर गावातच पोस्टमार्टेम करून अंत्यसंस्कार करण्याचे ठरले असल्याचे सांगण्यात आले असून त्यासाठी वैद्यकीय पथक गावाकडे गेले आहे.
वाचा:
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times