चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत रिलायन्सच्या महसुलात मात्र वाढ झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एकूण महसुलात तब्बल ५८.२ टक्के वाढ झाली असून समूहाला १.४४ लाख कोटींचे उत्पन्न मिळाले. रिलायन्स समूहाने आज शुक्रवारी सांयकाळी पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. त्यात कंपनीला करपूर्व नफा २७५५० कोटींचा मिळाला. त्यात वार्षिक आधारावर तुलना करता २७.६ टक्के वाढ झाली असल्याचे कंपनीने म्हटलं आहे.
करोनाच्या दुसऱ्या लाटेने संकट उभं केलेलं असताना देखील अशा आव्हानात्मक परिस्थितीत रिलायन्स समूहाने वृद्धी नोंदवली. रिलायन्सचा विविध क्षेत्रातील विस्तार आणि देशातील एकूण वस्तूंच्या खपात या समूहाचे मोठे योगदान असल्याचे रिलायन्स समूहाचे अध्यक्ष यांनी यावेळी सांगितले.
रिलायन्स जिओच्या नफ्यात मात्र ४ टक्के वाढ झाली असून कंपनीला ३६५१ कोटींचा नफा मिळाला. तर याच तिमाहीत जिओला १८९५२ कोटींचा महसूल मिळाला आहे. रिलायन्स रिटेलच्या महसुलात मात्र १९ टक्क्यांची वाढ झाली आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत रिलायन्स रिटेलला ३३५६६ कोटींचा महसूल मिळाला आहे. त्यात वार्षिक आधारावर तब्बल ८० टक्के वाढ झाली. तसेच रिलायन्स रिटेलच्या नफ्यात दुपटीने वाढ झाली आहे. पहिल्या तिमाहीत ९६२ कोटींचा नफा मिळाला असल्याचे कंपनीने म्हटलं आहे.
रिलायन्सच्या इंधन आणि रसायने व्यवसायाने देखील पहिल्या तिमाहीत चांगली कामगिरी केली आहे. कंपनीला या व्यवसायातून १.०३ लाख कोटींचा महसूल मिळाला असून त्यात ७५.२ टक्के वाढ झाली आहे. यातून कंपनीला १२२३१ कोटीचा नफा मिळाला. ज्यात ५० टक्के वृद्धी झाली आहे.
करोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर वाहतूक व्यवस्था पूर्वपदावर येत आहे. यामुळे देशभरात इंधन मागणी वाढल्याचे दिसून आले आहे. त्याचा फायदा रिलायन्स इंडस्ट्रीजला झाला आहे. रिलायन्सला तेल आणि वायू व्यवसायातून देखील चांगला महसूल मिळाला आहे. या व्यवसायातून १२८१ कोटीचे उत्पन्न मिळाले आहे. यंदा यातून ७९७ कोटीचा नफा मिळाला. गेल्या वर्षी या व्यवसायातून तोटा झाला होता. यंदा उत्पादनात वाढ केल्याने कंपनीला फायदा झाला आहे.
माध्यमांमध्ये देखील रिलायन्सने हातपाय पसरले आहेत. रिलायन्सला माध्यमांमधून १२१४ कोटींचा महसूल मिळाला असून त्यात ५०.४ टक्के वाढ झाली आहे. तर नफ्यात तब्बल ५९६ टक्के वाढ झाली असून १८८ कोटींचा नफा झाला असल्याचे रिलायन्स समूहाने म्हटलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times