१९९१ च्या अर्थसंकल्पाला ३० वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने मनमोहन सिंग यांनी करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशाच्या आर्थिक स्थितीवर भाष्य केलं. १९९१ ला ३० वर्षांपूर्वी काँग्रेस पक्षाने भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वापूर्ण सुधारणांचा श्रीगणेशा केला. देशाच्या आर्थिक धोरणासाठी एक नवीन मार्ग प्रशस्त केला. गेल्या तीन दशकांमध्ये विविध सरकारं याच मार्गावरून पुढे चाचले आणि देशाची अर्थव्यवस्था ही तीन हजार अब्ज डॉलरपर्यंत गेली. आता ही जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे, असं मनमोहन सिंग म्हणाले.
अतिशय महत्त्वाचं म्हणजे ३० कोटी भारतीय नागरिक गरीबीतून बाहेर पडले. कोट्यवधी नव्या नोकऱ्या निर्माण झाल्या. सुधारणांची प्रक्रिया पुढे गेल्याने स्वतंत्र उपक्रमांना चालना मिळाली. भारतात अनेक जागतिक पातळीवरील कंपन्या अस्तित्वात आल्या आणि भारत अनेक क्षेत्रांमध्ये एक जागतिक शक्ती म्हणून पुढे आला, असं मनमोहन सिंग यांनी सांगितलं.
१९९१ च्या आर्थिक उदारीकरणाची सुरवात ही देशातील आर्थिक संकटाने झाली होती. पण त्यावेळचे आर्थिक धोरण हे संकट पुरते नव्हते तर समृद्धी इच्छा आणि आपल्या क्षमतांवर विश्वास आणि अर्थव्यवस्थेवरील सरकारने नियंत्रण हटवल्याने विश्वासाचा पाया आणि आर्थिक सुधारणांची इमारत उभी राहिली, असं ते म्हणाले.
आरोग्य आणि शिक्षणासारखे सामाजिक क्षेत्र मागे पडले आणि ते देशाच्या आर्थिक विकासासोबत चालू शकले नाही. करोनाच्या संकटात अनेकांचा मृत्यू झाला आणि लाखो बेरोजगार झाले, असं घडायला नको होतं, असं मनमोहन सिंग म्हणाले.
ही वेळ आनंदित आणि मग्न होण्याची नाही. तर आत्मचिंतन आणि विचार करण्याची आहे. पुढील मार्ग हा १९९१ च्या तुलनेत अधिक आव्हानात्मक आहे. एक देश म्हणून आपल्याला आपला प्राधान्यक्रम पुन्हा एकदा निश्चित करण्याची गरज आहे. यामुळे प्रत्येक भारतीयाला आरोग्य आणि सन्मानजनक जीवन जगात येईल, यावर मनमोहन सिंग यांनी जोर दिला. ‘पृथ्वीवर कुठलीच शक्ती अशा विचाराला रोखू शकत नाही ज्यांची वेळ आली आहे’, फ्रान्सचे कवी व्हिक्टर ह्यूगो यांचा विचार मनमोहन सिंग यांनी यावेळी मांडला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times