सुनील नलावडे,

कोकणात झालेल्या प्रचंड पावसामुळे खेड, , संगमेश्वर, राजापूर, लांजा, रत्नागिरी आदी भागांना मोठा दणका बसला आहे. गुरुवारची रात्र शेकडो चिपळूणकरांनी भयावह अंधार, सर्वत्र पसरलेला पूर आणि मदतीसाठी आकांत अशा परिस्थितीत काढल्यानंतर, शुक्रवारी सकाळपासून बचावकार्याने वेग घेतला. शुक्रवारी सकाळी ६ वाजल्यापासून नौसेना, एनडीआरएफ तसेच रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील अनुभवी बचाव पथकांनी चिपळूणमध्ये धाव घेऊन अनेक कुटुंबांना सुरक्षित बाहेर काढले. इमारतींच्या गच्चीवर, माळ्यावर जीव मुठीत धरून बसलेल्या भयग्रस्त नागरिकांना तब्बल १३ तासांनंतर मदत मिळून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.

चिपळूण तालुक्यातील पूरस्थिती नियंत्रणात आली असून आता हळुहळू पाणी ओसरत असल्याने मदतकार्यास वेग आला आहे. एनडीआरएफची दोन, लष्कराचे एक, नौदलाची दोन, हवाई दलाची दोन पथके तसेच, १५ स्वयंसेवी संस्थामार्फत बोटींच्या साह्याने मदत कार्य युद्धपातळीवर सुरू झाले आहे. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे कामसुरू होते.

पुन्हा पुराची भीती?

चिपळुणात पाणी ओसरत असले तरी धरण क्षेत्रात पाऊस पडत असल्यामुळे पुन्हा शहरात पूरस्थिती होण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित निवारा स्थळांमध्ये स्थलांतरित व्हावे, असे आवाहन पालकमंत्री यांनी केले. शुक्रवारअखेर चिपळूण तालुक्यातील दीड हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून भोजन, पाणी व निवासाची व्यवस्था व वैद्यकीय मदत करण्यात आली आहे. शुक्रवारीही संपर्क प्रस्थापित न झालेल्या भागातील नागरिकांच्या मदतीसाठी हवाई दल व नौदलाकडून बचाव मोहीम सुरू आहे.

आंबा घाटात रस्ता खचला

कोल्हापूर-रत्नागिरी आंबा घाटात मंगळवारी रस्ता खचल्यामुळे वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे दूध, भाजीपाला आदी अत्यावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी साकव वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे.कोकणातील अनेक गावांमध्ये तसेच शहरातील रस्ते, बाजारपेठा व मुख्य रस्त्यांवर खडयांचे साम्राज्य पसरले आहे.

तुतारी एक्स्प्रेस माघारी
कोकण रेल्वेच्या चिपळूण स्थानकात उभी असलेली तुतारी एक्स्प्रेस अखेर शुक्रवारी मुंबईकडे रवाना झाली. गुरुवारी सकाळपासून ही ट्रेन येथे उभी होती. कोकण रेल्वेच्या विविध स्थानकांत गाड्या थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. या अडकलेल्या प्रवाशांची सर्व व्यवस्था कोकण रेल्वेने केली. त्याबद्दल रेल्वे प्रशासनाचे प्रवाशांनी आभार मानले.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here