मुंबई : राज्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पूर आला असून लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा यंदाच्या पावसाळ्यात राज्यात तब्बल १३ ठिकाणी सदृश्य पाऊस झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. निसर्गाच्या रौद्र रूपामुळे नागरिकांचे अतोनात हाल झाले असून घरं, दुकानं आणि संपूर्ण शहर पाण्याखाली गेल्यामुळे अर्थव्यवस्थाही कोलमडल्याचं पाहायला मिळत आहे.

हवामान विभागाचे आयआयटीएमचे हवामान तज्ञ डॉक्टर किरणकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात १३ ठिकाणी ढगफुटी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ताम्हिणी घाटामध्ये ४६८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर महाबळेश्‍वरमध्ये ४०० ते ५०० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

आत्तापर्यंत जागतिक हवामान संघटनेच्या मापानुसार याला ढगफुटी घोषित करण्यात आले असल्याची माहिती किरणकुमार जोहरे यांनी दिली आहे. ते माध्यमांशी बोलत होते. खरंतर, देशात दरवर्षीचा विचार केला तर सर्वाधिक पाऊस मेघालयातील चेरापुंजी येथे झाला आहे. यानंतर महाबळेश्वरचा नंबर लागतो. मात्र, यावर्षी रत्नागिरी सर्व रेकॉर्ड मोडून काढले. रत्नागिरी जिल्ह्याने महाबळेश्वरलाही मागे टाकले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हंगामाच्या पहिल्याच टप्प्यात २१ जुलैपर्यंत रत्नागिरीत सरासरीपेक्षा सुमारे १,२०० मिलिमीटर अधिक पावसाची नोंद झाली आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाने देशातील पावसाची महत्त्वाची ठिकाणे आणि प्रमुख शहरांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील पावसाने महाबळेश्वरला मागे टाकून दुसरे स्थान पटकावले आहे. देशात मेघालय आणि आसामच्या काही विभागांमध्ये दरवर्षी मोठ्या पावसाची नोंद होते. चेरापुंजीमध्ये पडणाऱ्या पावसाने आजवर विक्रम केला आहे. त्यामुळे चेरापुंजी हे सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण गणले गेले आहे.

रायगडसह ‘या’ भागांसाठी रेड अलर्ट जारी
दरम्यान, हवामान खात्याने सातारा जिल्ह्यासाठी नवा रेड अ‍ॅलर्ट जारी केला असून येत्या २४ तासात जिल्ह्यातील डोंगराळ घाट भागात जोरदार मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. पुढील २४ तास रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातही रेड अलर्ट देण्यात आला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here