पुणे: कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत गेल्या दोन दिवसांपासून थैमान घालणाऱ्या महापुरात आतापर्यंत ७६ जणांचा बळी गेला आहे. एकूण ५९ लोक बेपत्ता झाले असून ७५ जनावरे दगावली आहेत. अतिवृष्टीनंतर घडलेल्या वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये ३८ जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना अतिवृष्टीनं तडाखा दिला आहे. हा तडाखा इतका जबरदस्त आहे की गावेच्या गावे पाण्याखाली गेली आहेत. तीन दिवस झाले तरी परिस्थिती अद्याप जैसे थे आहे. एनडीआरएफसह लष्कर, नौदल, हवाई दलानंही मदत व बचावकार्यात झोकून दिलं आहे. लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली जात आहे. ९० हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

वाचा:

एनडीआरएफची २१, संरक्षण दलांची १४ आणि एसडीआरएफची चार पथके सध्या पूरग्रस्त भागांत कार्यरत आहेत. एनडीआरएफच्या ४८ आणि एसडीआरएफच्या ११ बोटींच्या मदतीनं बचावकार्य सुरू आहे. अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं जात आहे. सुरक्षित स्थळी हलविण्यात आलेल्या लोकांच्या अन्नपाण्याची सोय केली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत: संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली.

रायगड जिल्ह्यातील महाड व पोलादपूर तालुक्यासह एकूण सहा ठिकाणी दरडी कोसळल्या. एकट्या तळीये गावात दरड कोसळून ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात आंबेघर व मोरणा इथे दरडी कोसळून १६ जण बेपत्ता झाले आहेत. काही ठिकाणी लोक पुरात वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळं सर्वत्र हाहाकार उडाला आहे. जीवितहानीबरोबरच मालमत्तेचंही प्रचंड नुकसान झालं आहे. दरडग्रस्त गावांमध्ये मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here