: टोकियो : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिलं पदक जिंकल्यानंतर वेटलिफ्टर मीराबाई चानूवर राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून ते सर्वसामान्य नागरिकांनी कौतुकाचा वर्षाव केला. भारतासाठी रौप्यपदक जिंकल्यानंतर आनंद व्यक्त करताना मीराबाईने आपल्या ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट लिहली आहे. या निवेदनातून तिने देशभरातील तमाम भारतीयांचं मन जिंकलं आहे. त्याचीच चर्चा सध्या सोशल मीडियात सुरू झाली आहे.

भारताला रौप्यपदक मिळवून देणाऱ्या मीराबाईने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘माझ्यासाठी हे स्वप्न सत्यात उतरण्यासारखे आहे. हे पदक मी माझ्या देशाला समर्पित करते. करोडो भारतीयांनी माझ्यासाठी प्रार्थना केली आणि या प्रवासात ते माझ्यासोबत राहिले, याबद्दल मी त्यांची आभारी आहे.’

मीराबाई पुढे म्हणाली की, ‘मी माझ्या कुटुंबाचे विशेषत: माझ्या आईचे आभार मानते, कारण तिने माझ्यासाठी खूप त्याग केला तसेच माझ्यावर विश्वास ठेवला. तसेच मी आपले सरकार, क्रीडा मंत्रालय, भारतीय ऑलिम्पिक महासंघ, वेटलिफ्टिंग फेडरेशन ऑफ इंडिया, रेल्वे, ओजीक्यू, प्रायोजक आणि मार्केटिंग एजन्सी आयओएसने पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानू इच्छिते.’

शेवटी तिने म्हटले आहे की, ‘माझे प्रशिक्षक विजय शर्मा सर आणि इतर स्टाफ यांची मी विशेष आभारी आहे. त्यांनी माझ्या विजयासाठी कठोर परिश्रम घेतले आणि नेहमीच प्रेरणा दिली. पुन्हा एकदा माझ्या देशवासियांचे आभार. जय हिंद!’

मीराबाईने लिहलेल्या या पोस्टची सध्या तुफान चर्चा सुरू आहे. वेटलिफ्टिंगमध्ये गेल्या 21 वर्षांपासून एकाही खेळाडूला पदक जिंकता आलेले नव्हते. मीराबाईने हा पदकांचा दुष्काळ संपवला. पदक जिंकल्यानंतर मी खूश आहे. पूर्ण देशाच्या नजरा माझ्यावर होत्या. त्यामुळे मी थोडी घाबरले होते. पण सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याचा मी निर्णय घेतला आणि यश मिळाले, असं विजयानंतर मीराने मनोगत व्यक्त केलं आहे. मीराबाईवर पदक जिंकल्यावर आता बक्षिसांचा जोरदार वर्षाव सुरु झाला आहे. मणिपूर सरकारने मोठे बक्षिस मीराबाईसाठी जाहीर केले आहे. त्याचबरोबर आता भारताला दुसरे पदक कधी मिळणार, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here