: अतिवृष्टीमुळे बेहाल झालेल्या जिल्ह्यातील गावांना भेट देऊन खासदार (MP ) यांनी शेतकरी-शेतमजूर आणि गावकऱ्यांच्या वेदना जाणून घेतल्या. मुसळधार पावसात चिखल तुडवत आणि वाहत्या पाण्यातून वाट काढत खासदार नवनीत रवी राणा शेतशिवारात पोहोचल्या. यावेळी नवनीत राणा यांनी आपत्तीग्रस्तांना धीर दिला, तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणाही साधला.

‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः वाहन चालवत पंढरपूरला जाऊ जातात. त्यांना वाहन चालवण्याचा छंद असून त्या निमित्ताने का होईना त्यांनी या कठीण परिस्थितीत जिल्ह्यातील नागरिकांच्या वेदना जाणून घेण्यासाठी वाहन चालवत अमरावतीत यावे. ते शक्य नसेल तर विमानाने यावे, पण आता मातोश्रीबाहेर पडून जिल्ह्यातील हवालदिल, त्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्यावा,’ असं म्हणत नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.

नवनीत राणा यांनी खारतळेगाव येथील पुरात वाहून गेलेल्या प्रवीण गुडधे व अनिल गुडधे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. तसंच शासकीय यंत्रणेला तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकरी-गावकरी यांना तातडीने मदत करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मदतकार्यात किंवा नुकसानभरपाईच्या कामात दिरंगाई करण्याऱ्या अधिकाऱ्यांना माफ करणार नाही, असा इशारा यावेळी खासदार नवनीत राणा यांनी दिला.

गेल्या काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात पावसाचे थैमान असून अनेक भागात ढगफुटी होऊन प्रचंड महापूर आला आहे. नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. गावागावात पाणी घुसले असून अनेकांची शेती पाण्याखाली गेली आहे. तसंच घरात पाणी घुसले आहे आणि गुरेढोरे सुद्धा वाहून गेली आहेत. या पार्श्वभूमीवर नवणीत रवी राणा यांनी तात्काळ दिल्लीवरून अमरावतीकडे धाव घेतली आणि आज भरपावसात खारतळेगाव, टाकरखेडा संभु, रामा-साहूर, शिराळा आदी गावात जाऊन शेतशिवारांची, नुकसानग्रस्त घरांची पाहणी केली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here