म. टा. प्रतिनिधी,

पावसाने विश्रांती घेतल्याने महापुराचा विळखा सैल होत असला तरी कोल्हापूर जिल्ह्यात पूराचा धोका कायम आहे. पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गसह गोवा व कोकण याबरोबरच सांगलीला जाणारे मार्ग वाहतुकीसाठी बंदच आहेत. एनडीआरएफच्या सात पथकासह लष्कराचे जवानही दाखल झाले असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. शिरोळ तालुक्यातील तीस हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले असून शहरातील पूरस्थिती कायम आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात सलग तीन दिवस पावसाने धुमाकूळ घातला. काही भागात ५०० मिमी पेक्षा अधिक पाऊस कोसळल्याने जिल्ह्यात महापूर आला आहे. शुक्रवारी महापुराचा विळखा घट्ट झाला. अर्धे कोल्हापूर शहर पाण्याच्या विळख्यात असून जिल्ह्यातील अनेक गावांना ही पाण्याने वेढले आहे. पंचगंगा नदी सध्या 54 फुटांपेक्षा अधिक उंचीने वाहत आहे. राधानगरी धरण 96 टक्के भरले आहे. रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी ते शंभर टक्के भरल्यानंतर स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुन्हा पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढू शकते.

क्लिक करा आणि वाचा-
तीन दिवस झालेल्या पावसामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह आपत्ती व्यवस्थापन कार्यालयातही पाणी घुसले आहे. पुणे ते बंगळुरु महामार्गावर दोन ठिकाणी पाणी आल्यामुळे काल पासून हा रस्ता बंद आहे. दिवसभर हा रस्ता बंद होता. यामुळे शेकडो वाहनधारक रस्त्यावर अडकून पडले आहेत आमदार ऋतुराज पाटील यांनी त्यांच्या जेवणाची सोय केली. याशिवाय कोल्हापूर ते सांगली रस्ता तसेच कोल्हापूर- बेळगाव, कोल्हापूर- गोवा, कोल्हापूर-रत्नागिरी हे महत्त्वाचे रस्ते बंद आहेत. आंबा, आंबोली,करूळ घाटात दरड कोसळल्याने कोकणात जाणारे रस्ते बंद आहेत.

क्लिक करा आणि वाचा-
शुक्रवारी ४१ तर शनिवारी शिरोळ तालुक्यातील तीस हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. जिल्ह्यात एनडीआरफीची सात पथके कार्यरत आहेत. चिखली व आंबेवाडी येथील पूरग्रस्तांना दिवसभर सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. दुपारी लष्काराची चार पथके कोल्हापुरात दाखल झाली. शिरोळमध्ये ही पथके बचावाचे काम करत आहेत. काल दिवसभरात महापुरामुळे पाच जणांचा मृत्यू झाला. शनिवारी मात्र कोणतीही दुर्घटना घडली नाही. राधानगरी तालुक्यातील आटेगाव येथे डोंगर खचला. खबरदारीचा उपाय घेतल्याने जिवितहानी झाली नाही.

क्लिक करा आणि वाचा-
सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला असून पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतही घट होत आहे. शहर पाणी पुरवठा यंत्रणा बंद असल्याने टँकरव्दारे त्याचा पुरवठा करण्यात येत आहे. चार दिवसानंतर प्रथमच आज सूर्यदर्शन झाले. अलमट्टी धरणातून तीन लाख क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर शेती पाण्यात गेल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. याशिवाय घरात पाणी घुसल्याने जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यांच्यासह खासदार संजय मंडलिक व धैर्यशील माने यांनी विविध पूरग्रस्त भागात भेट दिली. प्रशासनाला सूचना देत मदतकार्याला वेग आणला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here