नवी दिल्ली : भारताला तिसऱ्या वनडे सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. पण आता रविवारी ट्वेन्टी-२० मालिकेतील पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. पराभवामुळे आता भारतावर दडपण वाढले असून पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात आता मोठ्या बदलांचे संकेत स्पष्टपणे मिळत आहेत.

१.पहिला बदलभारतीय संघातील पहिला बदल म्हणजे फलंदाज मनीष पांडेला यावेळी डच्चू दिला जाऊ शकतो. कारण श्रीलंकेविरुद्धच्या तिन्ही सामन्यांमध्ये त्याला संधी देण्यात आली होती. पण एकाही सामन्यात त्याच्याकडून चांगली फलंदाजी पाहायला मिळाली नाही. त्याचबरोबर मनीष पांडेकडून दोन सोपे झेलही सोडले गेले. त्यामुळे फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या दोन्ही विभागांत मनीष पांडे हा अपयशी ठरला आहे. त्यामुळे पहिल्या ट्वेन्टी-२० लढतीत मनीष पांडेला वगळण्याचे संकेत मिळत आहेत.

२. दुसरा बदलश्रीलकेविरुद्धच्या तिन्ही वनडेमध्ये हार्दिक पंड्याला संधी देण्यात आली होती. पण तिन्ही सामन्यांमध्ये हार्दिकने जबाबदारीने फलंदाजी केली नसल्याचेच पाहायला मिळाले आहे. त्याचबरोबर गोलंदाजीमध्येही त्याला चमक दाखवता आलेली नाही. त्यामुळे तिन्ही सामन्यांतील अपयशानंतर आता हार्दिकला पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात संघातून बाहेर करण्यात येऊ शकते. त्यामुळे हार्दिकच्या जागी आता संघात कोणाला संधी द्यायची, याचा विचार नक्कीच संघ व्यवस्थापनाला करावा लागेल.

३. तिसरा बदलभारताने तिसऱ्या वनडेमध्ये आपली संपूर्ण गोलंदाजीच बदलली होती. त्यामुळे पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात नवदीप सैनीला वगळण्यात येऊ शकते आणि त्याच्याजागी भुवनेश्वर कुमारला संधी देण्यात येऊ शकते. कारण तिसऱ्या सामन्यात सैनीला चांगली गोलंदाजी करता आली नव्हती. त्याचबरोबर चेतन साकरियाने मात्र दोन विकेट्स मिळवत धावाही वाचवल्या होत्या. त्यामुळे या सामन्यात चेतनला संघात कायम ठेवण्यात येईल आणि भुवनेश्वरला सैनीच्या जागी संघात स्थान देण्यात येऊ शकते.

४. चौथा बदलभारतीय संघात यावेळी तिसऱ्या सामन्यात संधी मिळालेल्या कृष्णप्पा गौतमला वगळण्यात येऊ शकते. कारण तिसऱ्या सामन्यात त्याला कामगिरीचा प्रभाव पाडता आला नव्हता. गौतमच्या जागी संघात कृणाल पंड्याचे पुनरागमन होऊ शकते. कारण कृणालकडे चांगला अनुभव आहे आणि तो गोलंदाजीही चांगली करतो. फक्त फलंदाजीमध्ये त्याने अजून थोडी सुधारणा केल्यास त्याचा भारतीय संघाला फायदा होऊ शकतो. त्यामुळे हा महत्वाचा बदल संघात करण्यात येऊ शकतो. त्याचबरोबर वरुण चक्रवर्ती हा देखील भारतीय संघापुढे चांगला पर्याय असेल.

५. पाचवा बदलभारतीय संघाला तिसऱ्या क्रमांकावर अजून एक चांगला फलंदाज मिळालेला नाही. त्यामुळे या सामन्यात तिसऱ्या सामन्यासाठी इशान किशन किंवा एका राखीव सलामीवीराचा विचार केला जाऊ शकतो. आतापर्यंत ऋतुराज गायकवाड आणि देवदत्त पडीक्कल यांना संधी मिळालेली नाही. त्यामुळे तिसऱ्या स्थानासाठी इशान किशन, ऋतुराज गायकवाड आणि देवदत्त पडीक्कल यांच्यांमध्ये चांगली स्पर्धा होऊ शकते. कारण सूर्यकुमार यादवला तिसऱ्या स्थानावर पाठवल्यावर मधल्याफळीत आश्वासक फलंदाज दिसत नाही. त्यामुळे फलंदाजीमध्ये तिसऱ्या स्थानाचा गंभीरपणे विचार भारतीय संघाला करावा लागणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here