म. टा. प्रतिनिधी, मुंबई
करोनाप्रतिबंधक लशीच्या दोन मात्रा घेतलेल्यांना रेल्वेप्रवासाची मुभा देण्यात यावी, या मागणीसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांच्या नेतृत्वाखाली बोरिवली पश्चिम स्थानकाबाहेर शनिवारी आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाबाहेर शुक्रवारीच आंदोलन करण्यात आले होते.

राज्य सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे रेल्वे प्रवाशांच्या न्याय्य हक्कासाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. प्रवाशांच्या संयमाचा अंत पाहू नका. दोन मात्रा घेतलेल्यांना प्रवासाची परवानगी द्या, अन्यथा उग्र आंदोलन करू, असा इशारा दरेकर यांनी यावेळी दिला.

लशीच्या दोन मात्रा घेतलेल्यांना रेल्वेप्रवासाची मुभा देण्यात यावी, अशी मागणी दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली होती. परंतु सरकारने अद्यापही कोणतीही दखल घेतली नाही. मुंबईत कामाकरिता ये-जा करण्यासाठी खासगी वाहनाला रोज ७००-८०० रुपये मोजावे लागत आहेत. बसने येण्यासाठी नागरिकांना तीन ते चार तास रांगेत उभे राहावे लागते. बसमध्ये प्रवास करण्यास मुभा आहे, तर रेल्वेप्रवासाला मुभा का नाही, या परिस्थितीत सामान्य चाकरमान्यांची नोकरी धोक्यात येत असून, त्यांनी एवढा पैसा आणायचा कुठून, असा सवाल दरेकर यांनी केला.

आंदोलनावेळी लस घेतलेल्यांना लोकलमुभा देण्यासंबंधी मत जाणून घेण्यासाठी प्रवाशांच्या सह्यांची मोहीम राबवण्यात आली. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. टप्प्याटप्प्याने सर्व रेल्वे स्थानकांत प्रवासमुभा मिळावी, यासाठी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रवासी सल्लागार समिती सदस्य कैलाश वर्मा यांनी दिली.

आंदोलनानंतर रेल्वेप्रवासाची मुभा देण्यात यावी, याकरिता बोरिवली स्टेशन मास्तर घोष यांना निवेदन देण्यात आले. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार सुनील राणे, आमदार मनीषा चौधरी आणि प्रवासी उपस्थित होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here