सुनील नलावडे, रत्नागिरी

मुसळधार पावसाने खेडमध्ये जगबुडी आणि नारिंगी नदीला महापूर येऊन शहर व ग्रामीण भागांची दैना झाली. शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी घुसले. बाजारपेठा पुराच्या पाण्याने उद्ध्वस्त झाल्या. दरड कोसळून खेडमध्ये १९ जणांचा मृत्यू झाला. घरे व बाजारपेठ कित्येक तास पाण्याखाली राहिल्याने व्यापाऱ्यांचे, नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घरे व दुकाने चिखल मातीने भरून गेली आहेत. शुक्रवारी रात्रीपासून पुरस्थिती आटोक्यात आल्यानंतर हे विदारक दृश्य समोर आल्यानंतर कोकणवासीय पार हेलावले आहेत.

चिपळूण तालुक्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली असून पूर ओसरल्यानंतर शहरातील बाजारपेठ आणि आसपासच्या भागांत मोठ्या प्रमाणावर हानी झाल्याचे चित्र आहे. व चिपळूणमध्ये किमान दहा ते बारा फूट तर काही भागांत त्यापेक्षाही अधिक पाणी साचले होते. शनिवारी सकाळी दहा वाजल्यानंतर खेड, चिपळूणच्या बाजारपेठा पाण्याच्या वेढ्यातून मुक्त झाल्यावर सर्वच ठिकाणी चिखलाचे सम्राज्य पसरले आहे. चार चाकी व दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. जेसीबी, ट्रॅक्टर, पाण्याच्या टँकरच्या मदतीने स्वच्छता करण्याच्या कामाला नगरपालिका, आरोग्य संस्था लागल्या आहेत.

चिपळूण तालुक्यात घरात साचलेला चिखल स्वच्छ करून अस्ताव्यस्त झालेले साहित्य उचलण्याचे काम सुरू आहे. घराची अवस्था पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले. पाणी ओसरण्यास सुरूवात झाल्यानंतर अनेकांची चारचाकी आणि दुचाकी जाग्यावर नसल्याचे आढळले. काहींची वाहने वाहून गेली तर काही वाहने पाण्याच्या प्रवाहामुळे उलटी झालेली दिसली.

पुरात एसटीच्या टपावर आठ तास
चिपळूण आगाराचे आगार व्यवस्थापक रणजीत राजेशिर्के व इतर ९ कर्मचारी हे आगारात असताना पुराचे पाणी वाढायला सुरुवात झाली. हळूहळू आगर पाण्याखाली जाऊ लागले. तशी त्या १० जणांनी आपल्या एसटीचाच आधार घेतला आणि टपावर चढले. राजेशिर्के यांच्याकडे एसटी आगारातील साडेसात लाखांची रोकड होती. पण एवढ्या मोठ्या संकटात कर्तव्य महत्त्वाचे मानून भरपुरातही या कर्मचाऱ्यांनी ही रक्कम सांभाळली. एक दोन तास नव्हे तर तब्बल आाठ तास हे कर्मचारी बस टपावर अडकून होते. अखेरीस तीनच्या वाजण्याच्या सुमारास तेथे सुटका पथके आली आणि त्यांनी कर्मचाऱ्यांची सुटका केली.

वीजपुरवठा लवकरच
चिपळूण येथील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, साधनसामुग्री तातडीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. परिस्थितीचा आढावा प्रादेशिक कार्यालय येथील प्रभारी प्रादेशिक संचालक प्रसाद रेशमे घेत असून मुख्य कार्यालय, मुंबई येथून विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्यामुळे चिपळूण, रत्नागिरी जिल्ह्यांतील वीजपुरवठा पूर्वपदावर येईल, असे महावितरण कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

मार्ग पूर्ववत पण रेल्वे नाही

सध्या कोकण रेल्वे सुरू नाहीत, मात्र मार्ग पूर्ववत झाल्याचे कोकण रेल्वेने जाहीर केले आहे. सध्या अडकलेल्या काही गाड्या सोडल्या आहेत. मात्र नियमित गाड्या सुरू करण्याबाबत लवकरच घोषणा करण्यात येईल, अशी माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी दिली आहे.

बँकांना सूचना
आज, रविवारी चिपळूण व खेड तालुक्यातील सर्व बँकांच्या शाखांतील व्यवहार सुरू ठेवावेत. तसेच एटीएममध्ये पुरेशा प्रमाणात रोकड उपलब्ध राहील, यासाठी कार्यवाही करावी. ज्या बँकाकडे फिरती एटीएम सुविधा उपलब्ध आहेत, त्या बँकांनी आवश्यक ठिकाणी सेवा उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना रत्नागिरीचे जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांनी बँकांना दिल्या आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here