मुंबईः रायगड, रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्रात गेल्या पाच सहा दिवसांपासून पावसानं थैमान घातलं आहे. पश्चिम महाराष्ट्र व रत्नागिरीत आलेल्या महापुरामुळं जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर, रायगड जिल्ह्यात रहिवाशांवर दरडी कोसळू लागल्या आहेत. गेल्या तीन ते चार दिवसांत राज्यात अतिवृष्टीमुळं व दुर्घटनेमुळं आतापर्यंत ११२ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, ९९ जण अजूनही बेपत्ता आहेत. मदत व पुनर्वसन विभागानं ही माहिती दिली आहे. (maharashtra landslide)

मुसळधार पावसाने खेडमध्ये जगबुडी आणि नारिंगी नदीला महापूर येऊन शहर व ग्रामीण भागांची दैना झाली. शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी घुसले. बाजारपेठा पुराच्या पाण्याने उद्ध्वस्त झाल्या. तर, महाडमध्ये सावित्री नदीचे पाणी शहरात शिरल्यामुळं पुराची परिस्थिती निर्माण झाली होती. रायगड व सातऱ्यात दरड कोसळून अनेक नागरिकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. एनडीआरएफ व लष्कराकडून बचावकार्य सुरु असले तरी पावसामुळं नद्यांवरील पूल तुटल्यामुळं बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत.

वाचाः

राज्य सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार, सुमारे एक लाख ३५ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. तर, ११२ जणांचा मृत्यू झाला असून ३ हजार २२१ जनावरे दगावली आहेत. दुर्घटनेत ५३ लोक जखमी झाले आहेत तर ९९ जण अद्यापही बेपत्ता आहेत.

गुरुवारी तळीये गावातील ३२ घरांवर दरड कोसळून तेथील कुटुंबे मातीखाली गाडली गेली. येथील सुमारे ४२ कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. आतापर्यंत ४० मृतदेह बाहेर काढण्यात आली असून दोन महिलांना वाचवण्यात यश आले आहे. अजूनही ४४ जण ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता आहे. खेडमध्येही दरड कोसळून १९ जणांचा मृत्यू झाला आहे. पाटण तालुक्यात डोंगरकडे कोसळून झालेल्या दुर्घटनेत आज ढिगाऱ्यांखालून २१ जणांना बाहेर काढण्यात आले आहे. याबरोबरच मृतांचा आकडा ३० वर गेला आहे. तर अजूनही १२ जण बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे.

वाचाः

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here