उसाच्या शेतीचे आगार असलेल्या प्रवरा परिसरात सध्या बिबट्यांची संख्या लक्षणीय आहे. अश्वी, प्रतापपूर, चिंचपूर, दाढ, चनेगाव, झरेकठी, सोंनगाव, हनुमंतगाव, पाथरे, कोल्हार, लोणी, तिसगाव, हसणापूर, गलनिंब, बाभळेश्वर, रामपूर, सात्रळ आदी प्रवरा परिसरातील चाळीस गावांत बिबट्यांची संख्या ५० हून अधिक आहे. रविवारी पहाटे लोणी-पाथरे रस्त्यावर असलेल्या हनुमंत गावच्या शिवारात ब्राह्मणे यांच्या वस्तीवरील मादी बिबट्यानं हल्ला चढवून कुत्र्याचा फडशा पाडला. नंतर तो रस्ता ओलांडून शेतात जात असताना भरधाव वाहनानं त्याला धडक दिली. या धडकेत मादी बिबट्या जागीच ठार झाला. या घटनेची माहिती स्थानिक वन्यजीव प्राणी मित्र विकास म्हस्के पाटील यांना मिळताच त्यांनी यासंदर्भात वनसंरक्षक- अधिकारी आदर्श रेड्डी, सहायक वनसंरक्षक अधिकारी रमेश देवखिळे आणि कोपरगाव वनविभागाचे अधिकारी संतोष जाधव यांना दूरध्वनीवरून कळवलं. वनखात्याचे अधिकारी व पथक तातडीनं घटनास्थळी पोहोचले. वनपाल सुरासे यांनी पंचनामा केला. पशुसंवर्धन अधिकारी डॉ. खपके यांनी शवविच्छेदन करून व्हिसेरा घेतला. मृत बिबट्यावर जवळच्या शेतातच अंत्यविधी करण्यात आले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times