म. टा. प्रतिनिधी, नगरः राष्ट्रवादीचे आमदार यांचा मतदारसंघ असलेल्या कर्जत नगरपंचायतीत भाजपच्या सत्तेची मुदत संपल्यानंतर प्रशासकाने घेतलेल्या एका निर्णयाची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. शहरातील नगरपंचायतीच्या कचरा गाड्यांवर पंतप्रधान नरेंद नोदी यांच्या आवाजातील स्वच्छता संदेशाची ऑडिओ सीडी लावली जात होती. ती बंद करून त्या जागी आता दुसरी सीडी लावण्यात येत आहे. कर्जत शहरात स्वच्छतेचे काम मोठ्या प्रमाणावर झाले आहे. त्याबद्दल अनेक सन्मानही मिळाले. या पार्श्वभूमीवर मोदींच्या आवाजातील संदेश कचरा गाड्यांवरून हटविण्यात आल्याने नगरपंचायत प्रशासनावर राजकारण केल्याचा आरोपही होऊ लागला आहे.

पाच वर्षांपूर्वी नगर पंचायत अस्तित्वात आली. पहिल्यांदाच तेथे भाजपची सत्ता आली. प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी कामाचा धडका सुरू करून आपली ओळखही निर्माण केली. सुरवातीच्या काळात आमदारही भाजपचे प्रा. राम शिंदे होते. राज्यात भाजपचे सरकार होते. या काळात कर्जतमध्ये विविध कामे झाली. जलयुक्त शिवार अभियानात कर्जतने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला होता. शहरातील स्वच्छता चांगली राहावी यासाठी ग्रामपंचायतीच्या घंटा गाड्यांवर पंतप्रधान मोदी यांचा ‘एक पाऊल स्वच्छतेकडे’ आणि नागरिकांना स्वच्छतेचा संदेशाचा ऑडिओ बनवून स्वच्छतेचे आव्हान करण्यात येत होते. या घंटागाडीच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना रोज मोदींच्या आवाजातील संदेश ऐकायला मिळत होता.

आता कर्जत नगरपंचायतीची मुदत संपली आहे. करोनामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे सध्या प्रशासकामार्फत कामकाज सुरू आहे. अशा परिस्थितीत गेल्या काही दिवसांपासून घंटागाड्यांवरील मोदींच्या आवाजातील संदेश गायब झाला आहे. त्या जागी आता दुसऱ्यांच्या आवाजातील संदेश ऐकू येत आहे. प्रशासकीय राजवट सुरू झाल्यानंतर नगरपंचायतीने विविध बदल करण्यास सुरवात केली असून त्यापैकी हा एक असल्याचे दिसून येते.

मधल्या काळात कर्जत शहरात स्वच्छतेचे व्यापक काम झाले. नागरिकांनी आणि स्वयंसेवी संस्थांनी वाहून घेऊन हे काम केले. अर्थात आमदार पवार, त्यांच्या मातोश्री आणि सहकाऱ्यांचाही या कामात प्रत्यक्ष सहभाग होता. मात्र, त्याही काळात मोदींच्या आवाजातील सीडी गाड्यांवर कायम होती. आता मात्र भाजपच्या सत्तेची मुदत संपल्यानंतर ती बदलण्यात आली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here