मुंबई– ‘दुहेरी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. उर्मिला अभिनेत्रीसोबतच यशस्वी युट्यूबर देखील आहे. आपल्या पोस्टमधून उर्मिला चाहत्यांसोबत अनेक किस्से शेअर करत असते. अभिनय कारकिर्दीच्या सुरुवातीला उर्मिलाला अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागलं होतं. त्यातही सगळ्यात जास्त धक्कादायक प्रसंग म्हणजे जेव्हा उर्मीलावर चोरीचा आळ घेण्यात आला. परंतु, आता मात्र ज्या लिपस्टिकमुळे उर्मिलावर चोरीचा आळ घेण्यात आला, त्याच लिपस्टिकच्या ब्रॅण्डने उर्मिलाला प्रसिद्धीसाठी संपर्क केला. यानिमित्ताने पोस्ट करत उर्मिलाने घडलेला संपूर्ण प्रसंग चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

उर्मिलाने पोस्ट करत लिहिलं, ‘तर झालं असं, एका मोठ्या हिंदी मालिकेच्या सेटवर त्या मालिकेतील अभिनेत्रीची मेकअप आणि हेअर ड्रायरची बॅग चोरीला गेली. त्याचवेळेस पैसे साठवून मी मेकॉसमॅटीक्सइंडियाची एक लिपस्टिक विकत घेतली होती. तेवढी एकच लिपस्टिक अप्रतिम क्वालिटीची, ब्रॅंडेड आणि माझ्या ओठांना रॅश न येऊ देणारी असल्यामुळे मी प्रत्येक शुटिंगमधे ती वापरायचे. मराठी कलाकाराच्या पर डेपेक्षा मोठ्या किंमतीची लिपस्टिक माझ्या हातात दिसल्याने, माझ्यावर चोरीचा पहिला संशय घेण्यात आला. या प्रकरणात माझा काहीही संबंध नसल्याने साहजिकच त्यांना मी माझी संपुर्ण बॅग चेक करु दिली.’

उर्मिलाने पुढे लिहिलं, ‘माझा मोठा भाऊ भारतातील सर्वात तरुण IPS अधिकारी म्हणून निवडला गेलेला असून, माझे वडिल व्याख्यान आणि प्रवचने करतात. माझ्या कुटुंबातील प्रत्तेक पुरुष पिढ्यांपिढ्या शेती करतोय. कलेचा कसलाही वारसा नसलेल्या कुटुंबातील मी पहिलीच मुलगी आहे, जी एकटी २ बस आणि २ लोकल बदलून, मुंबईत प्रामाणिकपणे ॲाडिशन पास करुन, सेटवरील एकमेव मराठी कलाकार असूनही वेगळ्या भाषेत काम करतेय. बेंबीच्या देठापासून ओरडून मला त्यांना सांगायचं होतं की मी चोर नाही. त्या माझ्या सर्वात आवडत्या एकमेव लिपस्टिकमुळे माझी डायरेक्ट लायकी काढण्यात आली होती. इतकं अपमानास्पद कधीच वाटलं नव्हतं मला. परवा मेकॉसमॅटीक्सइंडियाचा मला मेल आला, आम्हाला तुमच्या मराठी युट्यूब चॅनेलवर आमचं नविन प्रॅाडक्ट पहिल्यांदा लॅांच करायचंय आणि आम्ही तुमच्या प्रामाणिक प्रतिक्रेयेचे तुम्हाला पैसे देऊ! तुम्ही तुमच्या गोड मराठी भाषेतच बोला हा त्यांचा आग्रह होता.’ असं लिहत उर्मिलाने घडलेला प्रसंग सांगत चाहत्यांसोबत तिचा आनंद व्यक्त केला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here