रायगड जिल्ह्यातील दरड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेची टीडीआरएफची पथके घटनास्थळी मदत कार्य राबवत असताना ठाणे महापालिकेचे आणखी एक पथक पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पाठवण्यात येत आहे. या विविध पथकातंर्गत आरोग्य पथक पाठविण्यात येणार असून या पथकामध्ये करोना, साथ रोग आणि ताप सर्वेक्षणासाठी स्वतंत्र वैद्यकीय पथके पाठविण्यात येणार आहेत. या पथकांसोबत १० हजार रॅपीड ॲंटीजन टेस्टींग किटस्, मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसीस टेस्टींग कीटस्, तीन डॅाक्टर्स, नर्सेस, वॅार्डबॅाय आणि मोठ्या प्रमाणात औषध साठा पाठविण्यात येणार आहे. साफसफाई, फवारणीसाठी सफाई कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, फायलेरिया कर्मचारी तसेच त्यांच्यासोबत २४ पंप, ४ स्प्रेईंग मशीन, ४ फॉगिंग मशीन, सोडियम हायपोक्लाराईड व फवारणीसाठी लागणारे सर्व रसायनांसह सुसज्ज ९० कर्मचाऱ्यांचे पथक पाठविण्यात येत आहे.
नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी १० हजार लिटर्स पाण्याचा एक टॅंकर आणि स्वच्छतेसाठी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा १० हजार लिटर्स क्षमतेचा एक टॅंकर असे एकूण दोन टॅंकर पाठविण्यात येत आहे. तसेच पिण्याच्या पाण्याच्या बाटल्याचे दोन ट्रक, रेशनिंग, किटस्, ५ हजार सतरंजीही पाठविण्यात येणार आहेत. मृत जनावरांचे पंचनामे करून त्यांची तातडीने विल्हेवाट लावता यावी यासाठी महापालिकेच्या पशू वैद्यकीय अधिकारी आणि त्यांची टीमही रवाना होत असून या सर्व पथकांसोबत महापालिकेच्या ८ ते ९ मिनी बसेस, दोन डंपर, २ ट्रक, ४ जीप आणि इतर साहित्य पाठविण्यात येणार आहे. दरम्यान पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार ठाणे महानगरपालिकेच्या टीडीआरएफ जवानांचे एक पथक पहिल्या दिवसांपासून मदत कार्यात गुंतले असून खुद्द पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाण्याचे महापौर नरेश गणपत म्हस्के हे दोन दिवस महाड येथे तळ ठोकून मदत कार्यावर लक्ष ठेवून होते. महापालिकेची ही विविध पथके उपनगर अभियंता गुणवंत झांबरे आणि आगार व्यवस्थापक दिलीप कानडे यांच्या अधिपत्त्याखाली रवाना होणार असून ही पथके स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने मदत कार्य करणार आहेत.
करोना चाचणी आणि ताप सर्वेक्षण
महाड आणि पोलादपूर येथील नैसर्गिक आपत्तीनंतर कुठलाही साथरोग उद्भवू नये तसेच करोनाचा संसर्ग वेळीच प्रतिबंधीत करता यावा यासाठी मोबाईल टेस्टींग व्हॅन, १० हजार रॅपिड ॲंटीजन टेस्टींग कीटस् तसेच ताप सर्वेक्षणासाठी थर्मल गन्स, ॲाक्सीमीटर, मोठ्या प्रमाणात औषध साठा आणि कर्मचाऱ्यांची टीम त्या ठिकाणी काम करणार आहे. तसेच साथरोग नियंत्रणासाठीही स्वतंत्र वैद्यकीय पथक रवाना होत असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सांगितले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times