नंदुरबार : जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील कळंबू गावाचे सुपुत्र निलेश अशोक महाजन यांना रविवार (दि.२४) रोजी रात्री साडेआठ वाजता वीरमरण आले. शहीद निलेश अशोक महाजन हे मणिपूर येथे कर्तव्य बजावत असताना दि.६ नोव्हेंबर २०२० रोजी गोळी लागून गंभीर जखमी झाले होते. त्यांना सहकाऱ्यांच्या मदतीने गुवाहाटी येथे दाखल करून उपचार सुरू करण्यात आले होते. गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून उपचार सुरू असताना शनिवार २४ जुलै रोजी रात्री आठ वाजता त्यांची प्रकृती अधिक खालावली व त्यानंतर त्यांना रात्री साडेआठ वाजता वीरमरण आले.

शहीद निलेश यांचे बालपण व शिक्षण कळंबू येथे झाले होते. वडील व लहान काका सैन्यदलात असल्याने त्यांना देशसेवा करण्याची लहानपणापासून आवड व ओढ होती. मात्र काही कळण्याअगोदरच वडिलांचे निधन झाले. त्यानंतर काही वर्षांनी आईचेही निधन झाल्याने तिघा भावंडांचा आधार गेला.

संघर्षातून शिक्षण आणि देशसेवेत रुजू
अतिशय कमी वयात आई-वडिलांचे छत्र हरपले. त्यानंतर दोघा भावंडांनी निलेशच्या शिक्षणासाठी मदत केली. निलेशचे प्राथमिक शिक्षण कळंबू येथील जि. प. मराठी शाळेनंतर पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण येथील डी. जी. बी. शेतकी विद्यालयात होऊन पुढे दोंडाईचा येथील दादासाहेब रावल कॉलेज येथे एन. सी. सी. च्या तीन वर्षांच्या शिक्षणानंतर नांदेड येथे आर्मी पायु मराठा युनिट मध्ये २०१६ मध्ये कमी वयात २१ व्या वर्षी भरती झाले. त्यानंतर १ सप्टेंबर २०१६ रोजी बेळगाव ( कर्नाटक ) येथे पुढील प्राशिक्षण पूर्ण करून सुरुवातीला दिल्ली येथे रुजू झाले.

मणिपूर येथेही निलेश महाजन यांनी सेवा बजावली. पाच ते साडेपाच वर्ष सेवा बजावल्यानंतर वयाच्या २६ व्या वर्षी त्यांना वीरमरण आल्याने कळंबू गावावर शोककळा पसरली आहे. निलेशच्या पच्छात एक विवाहित बहिण सीमा किशोर महाजन व मोठा भाऊ दीपक अशोक महाजन हा शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथील एम. आय. डी. येथे सुदर्शन मिनरल सुपरवायझर या पदावर असल्याने ते तालुक्यातील सोनगीर येथे वास्तव्यास आहे.

शहीद निलेश यांचे पार्थिव गुवाहाटी येथून विमानातून ता. २५ रोजी रात्री उशिरापर्यंत धुळे येथे येण्याचा अंदाज असून, धुळे येथून ता. २६ रोजी शासकीय वाहनाने सोनगीर येथील राजकुमार नगरातील राहत्या घरून अत्यंयात्रा निघेल आणि शासकीय इतमामात ता. २६ रोजी दुपारी सोनगीर येथील स्वामी नारायण मंदिराच्या मैदानावर अंत्यसंस्कार पार पडतील, असं शहीद निलेश यांचा मोठा भाऊ दीपक महाजन आणि नातेवाईक शैलेश देवरे यांनी सांगितलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here