: जिल्ह्यातील महापुराचा विळखा सैल होत असताना पुन्हा नवी भीती निर्माण झाली आहे. राधानगरी धरणाचे पाच दरवाजे उघडल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा महापुराचा () धोका कायम आहे.

सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी घटून ५१ फुटावर आली आहे. मात्र शिरोळ तालुक्यात पाणी पातळी वाढत असल्याने धोक्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे तेथे एनडीआरफ व लष्कराचे जवान बचाव कार्यात आहेत. पुणे ते बंगळुरू हा महामार्ग सायंकाळपर्यंत बंदच ठेवण्यात आला होता.

कोल्हापूर जिल्ह्यात दोन दिवसापासून पाऊस थांबला आहे. तरीही धरणक्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे सायंकाळी शंभर टक्के भरले. ४ वाजता धरणाचे दोन, ७ वाजता आणखी दोन आणि त्यानंतर पुन्हा एक असे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले. यामुळे पंचगंगा नदीची सध्याची पाणी पातळी ५१ फुटावरून वाढण्याची शक्यता आहे. पूर ओसरत असल्याने विळखा सैल होत असला तरी भीती कायम आहे. अद्यापही कोल्हापूर शहरातील काही भागात घुसलेले पाणी जैसे थे आहे.

शासन दरबारी हालचाली
शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडीसह अनेक गावांना पुराने वेढा दिला आहे, तेथे पाणी वाढण्याची शक्यता आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी या भागाची पाहणी केली. छावण्यांमध्ये स्थलांतरित पूरग्रस्तांसाठी नाश्ता व जेवणाची व्यवस्था करण्यासाठी एसडीआरएफ (राज्य आपत्ती निवारण निधी) मधून निधीची तरतूद व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगून मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी पालकमंत्री सतेज पाटील यांनी याबाबत दूरध्वनीवरून चर्चा केली.

कोल्हापूरातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार दोन दिवसात कोल्हापूर व सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.

जिल्ह्यात काय आहे नेमकी स्थिती?
रविवारी सायंकाळपर्यंत पुणे ते बंगळूरू महामार्गावर पाणी कायम असल्याने वाहतुकीसाठी तो रस्ता बंदच होता. शिरोली ते सातारा वाहतूक दुपारपासून सुरू करण्यात आली. कोल्हापूर ते बेळगाव, कोल्हापूर ते सांगली, कोल्हापूर ते रत्नागिरी हे प्रमुख मार्ग बंदच आहेत. दुपारी कोकरूड ते मलकापूर रस्ता वाहून गेला. विशाळगड येथे जमिनीला भेगा पडल्या असून दोन फुट या भेगा आहेत. शाहूवाडी तालुक्यात दरड कोसळल्याने पेट्रोल पंपच नष्ट झाला. दरम्यान, पूरपरिस्थितीमुळे पुढील तीन दिवस टोल नाके बंद ठेवावेत अशी मागणी खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी केली आहे. खासदार संभाजीराजे यांनी अनेक पूरग्रस्त भागात भेट देवून पाहणी केली. पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त व जनावरांचे प्रशासनाच्या वतीने गुरुदत्त साखर कारखान्याच्या छावणीमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. या छावणीला आज पालकमंत्री सतेज पाटील यांनी भेट देवून पूरग्रस्तांशी संवाद साधला तसेच त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.

यावेळी कारखान्याचे संचालक बबन चौगुले, संजय गायकवाड, विकास चौगले, पंचायत समिती सभापती दीपाली परीट, सैनिक टाकळीच्या सरपंच हर्षदा पाटील, नवे दानवाड च्या सरपंच वंदना कांबळे यांच्यासह पदाधिकारी, सरपंच, सैनिक टाकळीच्या स्वराज्य करिअर अकॅडमीच्या वतीने मदतकार्य करणारे विनोद पाटील, मंडल अधिकारी विनायक माने, आरोग्य अधिकारी, स्थलांतरित पूरग्रस्त व ग्रामस्थ उपस्थित होते.

पूरग्रस्तांसाठी छावणी उभारुन त्यांच्या रहाण्याची व जेवणाची व्यवस्था केल्याबद्दल गुरुदत्त शुगर कारखान्याचे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांच्या कामाचे कौतुक करुन पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, गुरुदत्त कारखान्याप्रमाणेच अन्य कारखान्यांनी देखील जनावरांना चारा पुरवण्यासाठी दत्त, जवाहर, शरद साखर कारखान्यांचे चेअरमन यांनाही विनंती करु. या भागातील पूरपरिस्थिती, मदतकार्य पोहोचवणे, आरोग्य सेवा सुविधा याबाबतआरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्याशी चर्चा करुन गतीने कार्यवाही सुरु आहे, असे सांगून ते म्हणाले, या महिन्या अखेर पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे पुन्हा पूरपरिस्थिती उद्भवू शकते, यासाठी १५ ऑगस्टपर्यंत नागरिकांनी छावणीत रहावे तसेच जनावरांनाही चारा छावण्यांमध्ये ठेवावे, असे आवाहन करुन आपल्या राहाण्याची, जेवणाची आणि आपल्या जनावरांच्या चारा-पाण्याची सोय केली जाईल, असे आश्वासन पालकमंत्री पाटील यांनी दिले. या छावणीतील जनावरांना गोकुळ दूध उत्पादक संघाच्या वतीने पशुखाद्य पुरवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पूरग्रस्तांना वेळेत चहा, नाश्ता, जेवण मिळतेय का, आरोग्य सुविधा दिली जातेय का, जनावरांना चारा दिला जातोय का, पशू वैद्यकीय सेवा दिली जातेय का? आदी विविध बाबींवर पुरग्रस्तांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा पालकमंत्री पाटील यांनी जाणून घेतल्या. शासन आपल्या सोबत असून सध्या मदतकार्यावर भर आहे. पूर ओसरल्यावर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन मदत दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here