रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा येथील जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी संवाद साधून आवश्यक ते औषधे, गोळ्या, वैद्यकीय पथके याबाबत माहिती राजेश टोपे यांनी घेतली. पूर ओसरल्यानंतर साथरोगाचा फैलाव रोखण्याबाबत प्रतिबंधात्मक उपचारासाठी आरोग्य यंत्रणेने सतर्क राहण्याचे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.
पूर ओसरल्यानंतर त्या भागात साथीच्या आजारांचा फैलाव होतो. हे लक्षात घेऊन आरोग्य विभागाच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु करण्याला प्राधान्य देतानाच दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचा उद्रेक टाळण्यासाठी आरोग्य यंत्रणेला सविस्तर सूचना राजेश टोपे यांनी दिल्या आहेत. पूरग्रस्त भागातील विहिरींच्या शुद्धीकरणासाठी ब्लिचिंग पावडर, क्लोरीनच्या गोळ्या आणि क्लोरीन द्रव यांचा वापर करण्याच्या सूचना यंत्रणेला देण्यात आल्या आहेत.
पुराचे पाणी साचल्यामुळे लेप्टोस्पायरोसिसचा धोका निर्माण होऊ शकतो. पुराच्या अथवा पावसाच्या साचलेल्या पाण्यातून पायी चालत गेलेल्या नागरिकांना त्यांच्या जोखमीकरणाच्या वर्गीकरणानुसार लेप्टोस्पायरोसिस प्रतिबंधात्मक गोळ्यांचे वाटप करावे. पूरग्रस्त भागात आणि पावसाचे पाणी साचलेल्या वसाहतींमध्ये आरोग्य तपासणी शिबिरे घ्यावीत, साथरोगांवरील तसेच सर्पदंशावरील औषधांचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून ठेवा, स्थानिक प्रशासनाच्या डास उत्पत्ती रोखण्याकरीता धूर आणि औषध फवारणी करावी, अशा सूचना आरोग्यमंत्र्यांनी विभागाला दिल्या आहेत.
दरम्यान, करोनाचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये पुरामुळे अन्य साथरोगांचा फैलाव रोखण्यासाठी जनजागृती मोहीम होती घ्यावी, असंही आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times