म. टा. विशेष प्रतिनिधी,

करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घाल्यानंतर आता परिस्थिती आटोक्यात येऊ लागली असून मुंबईतील करोनाचा संसर्ग जवळपास पूर्ण नियंत्रणात आला आहे. विविध रुग्णालयांमध्ये आता सहा हजार उपचाराधीन रुग्ण आहेत. यापैकी तब्बल अडीच हजार रुग्णांना कोणतीही लक्षणे नसल्याने पालिकेला दिलासा मिळाला आहे. तर ५५० रुग्णांची प्रकृती काळजीत टाकणारी आहे. गेल्या दीड वर्षात सात लाख ३२ हजार ७४१ मुंबईकरांना करोनाची लागण झाली असून यापैकी सात लाख ८ हजार ७१६ जणांनी करोनावर मात केली आहे.

मुंबईत गेल्यावर्षी ११ मार्चला करोनाचा पहिला रुग्ण आढळला. यानंतर दाटीवाटीची वस्ती आणि गर्दीमुळे काही दिवसांतच मुंबईत धारावी, वरळी, भायखळा, माटुंग्यासह शहर आणि उपनगरात अनेक ठिकाणी करोनाचे हॉटस्पॉट निर्माण झाले. यापाठोपाठ मार्चपासून आली. मात्र विविध उपाययोजनांमुळे ही लाट आता पूर्ण नियंत्रणात आली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून टप्प्याटप्याने निर्बंध शिथिल केले जात आहेत.

रुग्णसंख्या घटल्याने मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी आता १२०९ दिवसांवर गेला आहे. मुंबईत आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी ९७ टक्के रुग्णांनी करोनावर मात केली आहे. १५,७४९ जणांना म्हणजेच दोन टक्के रुग्णांना करोनामुळे जीव गमवावा लागला आहे. मृतांमध्ये हृदयविकार, मधुमेह, यासह इतर सहव्याधी आणि ज्येष्ठांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचेही आकडेवारीतून समोर आले आहे. एकूण मृतांमधील १३,४७६ जणांचे वय ५० पेक्षा जास्त असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत मार्च ते मे दरम्यान उपचाराधीन रुग्णांची संख्या तब्बल २५ हजारांवर तर अत्यवस्थ रुग्णांची संख्या दीड हजारांवर गेल्याने पालिकेची चिंता वाढली होती. मुंबईत सद्यस्थितीत ५८९७ उपचाराधीन रुग्ण असून यातील २५७८ जणांना कोणतीही लक्षणे नाहीत. तर २७६५ जणांना सौम्य लक्षणे आहेत. रुग्ण संख्या घटल्याने सध्या ८८८२ ऑक्सिजन खाटांपैकी ७६८२ खाटा, २२९३ आयसीयूपैकी १४०८ आणि १२७३ व्हेंटिलेटरपैकी १२७३ खाटा रिक्त आहेत.

मुंबईची करोनास्थिती

एकूण बाधित ७३२७४१

रुग्ण बरे ७०८७१६

मृत्यू १५७४९

उपचाराधीन रुग्ण ५८९७

अत्यवस्थ ५५४

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here