अतिवृष्टीनंतर कोकण व पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुराचे पाणी ओसरले असले तरी आता नवनवी संकटे समोर येत आहेत. कोल्हापूरमधील जलशुद्धीकरणाचे काही प्लाण्ट बंद पडल्यामुळं आता पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात सध्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. पुण्याबरोबरच सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि कोकण या शहरांत अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झालेले आहे. पुराचे पाणी शहरात शिरल्याने कोल्हापूरमधील जलशुद्धीकरणाचे काही प्लाण्ट बंद पडले आहेत. पंपिंग स्टेशनमध्ये पाणी घुसून साचल्याने पम्पिंग यंत्रणा बंद पडली आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी पोहोचवणे कठीण झाले आहे. त्यात महानगरपालिकेकडे टँकरची संख्या अपुरी आहे. त्यामुळे अडचणीत भर पडली आहे. ही अडचण लक्षात घेऊन कोल्हापूर महापालिका आयुक्तांनी पुणे म्हणगरपालिकेकडे टँकरची मदत व्हावी, अशी विनंती केली होती. पुणे महापालिकेने या विनंतीस तात्काळ प्रतिसाद दिला आहे.
कोल्हापूर महापालिकेच्या विनंतीवरून प्रभारी आयुक्तांच्या सूचनेनुसार, पाणीपुरवठा विभागाचे १७ मोकळे टँकर काल कोल्हापूरला रवाना करण्यात आले. टँकर्स बरोबर सुपरवायझर, इलेक्ट्रिशियन असे एकूण २१ जण आज सकाळी कोल्हापूरला सुखरूप पोहोचले. हा चमू साधारण एक आठवडा कोल्हापूरमध्ये राहील अशी शक्यता आहे. या कालावधीसाठी सगळ्यांच्या निवासाची तसेच जेवणाची संपूर्ण सोय कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत करण्यात येणार आहे.
आपत्तीच्या काळात इतर शहरांना जितकी शक्य होईल, तितकी मदत करण्याची परंपरा पुणे महानगरपालिकेने राखली आहे. वेळेत व तत्काळ मदत केल्याबद्दल कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तांनी पुणे महानगरपालिकेचे आभार मानले, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times