चिपळूण: मुख्यमंत्री यांच्याकडं मदत मागणाऱ्या पूरग्रस्त महिलेला धमकावल्याच्या आरोपांवर शिवसेनेचे चिपळूणचे आमदार यांनी आज प्रथमच प्रतिक्रिया दिली. ‘मला जाणीवपूर्वक बदनाम करायचा हा प्रयत्न आहे. या अपप्रचाराला मी फार महत्त्व देत नाही. ज्यानं कुणी हे घडवलंय त्याला मी योग्य वेळी उत्तर देईन. पण सध्या लोकांना मदत करण्यास माझं प्राधान्य आहे,’ असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. ( over allegations of threatening flood Victim)

कोकणातील अतिवृष्टीचा सर्वाधिक तडाखा चिपळूण शहर व परिसराला बसला. संपूर्ण शहर दोन दिवस पाण्याखाली होतं. पुरामुळं प्रचंड आर्थिक नुकसान झालं आहे. अनेक संसार उघड्यावर आले आहेत. तर, व्यापाऱ्यांचंही मोठं नुकसान झालं आहे. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चिपळूणला आले होते. त्यांनी चिपळूणच्या मुख्य बाजारपेठेत फिरून परिस्थितीची माहिती घेतली व पूरग्रस्तांशी संवाद साधला. यावेळी एक पूरग्रस्त महिला अक्षरश: ऱडत रडत तिच्यावर ओढवलेला प्रसंग सांगत होती. काहीही करून आम्हाला मदत करा. मदत केल्याशिवाय जाऊ नका, असं ती म्हणत होती. आमदार, खासदारांचा दोन महिन्यांचा पगार कोकणाकडं वळवा, असं ती म्हणाली. तेव्हा, मुख्यमंत्र्यांसमवेत असलेल्या भास्कर जाधव यांनी तिला उत्तर दिलं. ‘आमदार-खासदारांचा पाच महिन्यांचा पगार दिला तरी तुमचं नुकसान भरून निघणार नाही, असं ते म्हणाले. ‘तुझ्या आईला समजाव’ असं ते संबंधित महिलेच्या मुलाला म्हणाले. त्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही संधी साधत सत्ताधाऱ्यांवर आसूड ओढले आहेत.

या संपूर्ण प्रकरणावर ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलताना भास्कर जाधव यांनी आपली बाजू मांडली आहे. ‘खरंतर, मला यावर काहीही बोलायचं नाही. लोकांना मदत करण्यालाच सध्या माझं प्राधान्य आहे. कालही माझी तीच भूमिका होती. माझ्या मुलीसारखी असलेली मुलगी आणि नातवासारखा किंवा भाच्यासारखा असलेल्या मुलाशी मी बोलायचं नाही का? चॅनेलच्या प्रतिनिधीला विचारून बोलायचं का? असं असेल तर काम करणं कठीण होऊन जाईल. मला जाणीवपूर्वक बदनाम करायचा प्रयत्न केला गेला आहे. आज सोशल मीडियावर सगळे लोक त्या एकाच प्रसंगावरून माझ्यावर तुटून पडलेत. आम्ही आज रस्त्यावर उतरून कचरा उचलतोय, टीका करणारे आहेत कुठे? त्यामुळं त्याला मी फार महत्त्व देत नाही. ज्यानं कुणी हे घडवलंय त्याला मी योग्य वेळी उत्तर देईन,’ असं जाधव म्हणाले.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here