म. टा. प्रतिनिधी, नागपूर

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (सीएए) गैरसमज पसरवले जात आहेत. देशातल्या कुठल्याही व्यक्तीला बाहेर काढले जाणार नाही. मात्र लोकांमध्ये भीती निर्माण करूनच गठ्ठा मते मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भीतीच्या भोवती राजकारण फिरत असल्याची टीका केंद्रीय मंत्री यांनी केली.

जनसंघाच्या कामासाठी आयुष्य वेचणाऱ्या दिवंगत सुमतीताई सुकळीकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त सीताबर्डी येथील विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात कार्यक्रम घेण्यात आला. भारतीय जनता पक्ष नागपूर महानगर यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला माजी न्यायमूर्ती मिरा खडक्कार, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे, मोहन मते, माजी महापौर प्रवीण दटके, उपमहापौर मनिषा कोठे आदी उपस्थित होते. यावेळी जनसंघासाठी कार्य करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्या सुधा सोहनी यांच्यासह इतर ज्येष्ठ महिला कार्यकर्त्यांचा गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

भारताची फाळणी झाली तेव्हा पाकिस्तानने मुस्लीम राष्ट्र म्हणून घोषित केले, मात्र भारताने असे न करता भारतात ज्यांना राहायचे आहे ते राहू शकतात अशी भूमिका घेतली. पाकिस्तानात राहणाऱ्या अल्पसंख्याकांना तिथे असुरक्षित वाटत असेल तर, ते भारतात येऊ शकतात, असे त्यावेळीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्पष्ट केले होते. घटनेनुसारच ही प्रक्रिया आहे. मात्र गठ्ठा मते मिळविण्यासाठी ‘सीएए’ बाबत गैरसमज निर्माण केले जात असल्याचे गडकरी म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here