अभिषेक दुबे या पत्रकाराला झारखंडमध्ये अटक केल्यानंतर त्याच्या पोलिस चौकशीतून हा धक्कादायक खुलासा समोर आल्याचे नवाब मलिक यांनी सांगितलं आहे. हा पत्रकार तीन आमदारांशी संपर्कात होता. या आमदारांशी डील करण्यासाठी महाराष्ट्रातील भाजपचा एक माजी मंत्री देखील गेला असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. हा माजी मंत्री म्हणजे विदर्भातील नेते चंद्रशेखर बावनकुळे हे असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. तसंच २१ जुलै रोजी भाजपचे महाराष्ट्रातील पदाधिकारी मोहीत कंबोज, अमित यादव, आशुतोष ठक्कर हे लोक पैसे घेऊन झारखंड येथे दाखल झाले. मात्र पोलिसांची कुणकुण लागल्यानंतर या लोकांनी तिथून पळ काढला, असा आरोपही नवाब मलिकांनी केला आहे.
‘एसआयटी टीम महाराष्ट्रात आल्यानंतर संपूर्ण सहकार्य करणार’
‘आमदार फोडाफोडीच्या या कार्यक्रमाची चौकशी करण्यासाठी झारखंड सरकारने एसआयटीची तीन पथके स्थापन केली असून यापैकी एक पथक झारखंडमध्ये, तर दुसरे दिल्लीत आणि तिसरे पथक महाराष्ट्रात तपासासाठी येणार आहे. महाराष्ट्रातील दोन आमदारांचा देखील त्यात समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. झारखंडची एसआयटी टीम महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांना पूर्ण सहकार्य केले जाईल,’ अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.
‘राज्यात पूरपरिस्थितीमुळे लोक दुःखात असताना भाजपचे लोक झारखंडचे आमदार फोडण्यासाठी पैसे घेऊन जात आहेत. एका-एका आमदारासाठी कोट्यवधी रुपयांचे आमिष दाखवण्यात आले. पूरपरिस्थितीत हेच पैसे लोकांच्या मदतीसाठी देता आले असते, मात्र झारखंडचे सरकार पाडण्यासाठी भाजपची यंत्रणा काम करत आहे,’ असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.
‘कर्नाटक सरकार पाडत असताना मुंबई कनेक्शन दिसून आले होते. आता झारखंड सरकार पाडतानाही महाराष्ट्र कनेक्शन समोर आले आहे. लोकशाहीला डावलून सरकार स्थापन करण्याचे भाजपचे कारस्थान आता समोर आले असून झारखंड पोलिस नक्कीच याचा तपास करतील,’ असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times