येडियुरप्पा हे लिंगायत समाजे होते. हा समाज १९९० पासून भाजपचा समर्थक आहे. कर्नाटकमध्ये लिंगायत समाज १७ टक्के आहे. विधानसभेच्या २२४ पैकी जवळपास ९० ते १०० जागांवर लिंगायत समाजाचा प्रभाव आहे. यामुळे नवीन मुख्यमंत्री निवडताना भाजपलाही या समाजातून नेतृत्व देणं भाग आहे.
दिल्लीत भाजपच्या हालचाली
येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दिल्लीत भाजपच्या हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी कर्नाटक भाजपचे प्रभारी अरुण सिंह यांच्याशी चर्चा केली. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि अरुण सिंह यांना केंद्रीय निरीक्षक म्हणून कर्नाटकला पाठवण्यात येईल, असं सांगण्यात येत आहे.
लिंगायत समाज मठांच्या प्रमुखांना भाजपला इशारा
कर्नाटकात बी. एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. येडियुरप्पांच्या राजीनाम्यानंतर नवीन मुख्यमंत्री निवडण्यासाठी भाजपची तयारी सुरू आहे. दुसरीकडे कर्नाटकातील सर्वाधिक प्रभावी लिंगायत समाज मठांच्या प्रमुखांनी येडियुरप्पांना हटवण्याचा निर्णय हा चुकीचा असल्याचं म्हटलं आहे. भाजपला याच्या विपरित परिणामांना सामोरं जावं लागेल, असा इशारा लिंगायत समाज मठांच्या प्रमुखांनी दिला आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे २०१३ मध्ये येडियुरप्पा यांना भाजपने हटवले होते. यामुळे भाजपचं विधानसभेतील संख्याबळ फक्त ४० जागांवर आलं होतं.
कर्नाटकमध्ये निवडणूक कशी होते आणि कशी जिंकली जाते? हे दिल्लीतील नेत्यांना माहिती नाही. हे सरकार येडियुरप्पांनी बनवले आहे. यामुळे त्यांना हटवणं भाजपसाठी त्रासदायक ठरणारेल, असं लिंगेश्वर मंदिराचे मठाधीश शरण बसवलिंग म्हणाले.
आयुष्यभर येडियुरप्पांना मुख्यमंत्री बनवावं अशी आमची मागणी नाही. फक्त त्यांचा कार्यकाळ पूर्ण होऊ द्यावा, असं म्हणत होतो. आम्हाला या कार्यकाळात दुसरा कुठलाही मुख्यमंत्री नकोय. जे वयाचं कारण देत येडियुरप्पांना मुख्यमंत्रीपदावरून दूर करत आहेत त्यांना माहिती हवं की त्यांची ताकद ही तरुणांएवढीच आहे. इथे मतदान केंद्रापर्यंत जेवढी माहिती त्यांना आहे, तेवढी कुणालाच नाही, असं शरण बसवलिंग म्हणाले.
मठाधीश्वर आणि जवळपास ५ कोटी जनतेच्या अपेक्षांचा विचार करूनच भाजप निर्णय घेईल. कुठल्याही विचाराशिवाय निर्णय घेतला गेला, तर राज्यातील ५ हजार मठाधीश्वर एकजूट होतील. त्यांच्या विरोधाचा सामना केंद्राला करावा लागेल, असा इशारा शरण बसवलिंग यांनी दिला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times