राष्ट्रवादीचे आमदार यांच्या मतदारसंघातील कर्जत नगरपंचायतीवर भाजपची सत्ता होती. सत्तेची मुदत संपली, करोनामुळे निवडणूक घेता येत नाही. त्यामुळे सध्या प्रशासकामार्फत कामकाज सुरू आहे. या काळात हा बदल करण्यात आला आणि गाड्यांवरील मोदींच्या आवाजातील ऑडिओ सीडी बदलण्यात आल्याचा आरोप करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली.
भाजपचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन पोटरे, किसान आघाडीचे जिल्हा सरचिटणीस सुनील यादव, गणेश क्षीरसागर, शहराध्यक्ष वैभव शहा, ओबीसी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष डॉ. कांचन खेत्रे, आशा वाघ, राखी शहा, मनीषा वडे, मंदा होले, अश्विनी दळवी, निखिल सूर्यवंशी, राजेंद्र येवले, संजय जाधव यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते यांनी नगरपंचायतीत जाऊन या प्रकाराचा निषेध केला.
यावेळी मुख्याधिकारी जाधव यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पूर्वीची आणि बदल केलेली सीडी कार्यकर्त्यांना ऐकून दाखविली. जुनी सीडी कमी काळाची होती, ती वाढवून, काही बदल केले आहेत. प्रशासकीय राजवट असल्याने काही बदल करणे आवश्यक असल्याचे जाधव यांनी सांगितले. मात्र, नव्या नऊ मिनिटांच्या सीडीत केवळ १३ सेकंदच मोदींचा आवाज असल्याने कार्यकर्त्यांना ते मान्य नव्हते. स्वच्छ भारत अभियान हे पंतप्रधान मोदी यांनी सुरू केलेले असून ही स्पर्धा केंद्र सरकारची आहे. नगरपंचायतमध्ये पुरस्कार मिळण्यासाठी या शहरातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन पक्ष भेद न मानता स्वच्छता अभियान व माझी वसुंधरा अभियानमध्ये काम केले आहे. त्यामुळे मोदींचा आवाज आणि त्यांचे नाव हटविणे योग्य नाही अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली.
शेवटी मुख्याधिकारी जाधव यांनी यात बदल करण्याचा मान्य केले. आता सीडीच्या सुरुवातीला आणि मध्यतंरी आणि शेवटी असा तीन वेळा मोदींचा उल्लेख ठेवण्याचे व त्यांच्या आवाजातील काही भाग ऐकविण्याचे मान्य केले. लवकरच हा बदल करून दुरूस्त सीडी कचरा गाड्यांवर लावण्यात येणार आहेत. या आश्वासनानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांचे समाधान झाले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times