मुंबई : करोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातल्यानंतर राज्यात कडक निर्बंध लादण्यात आले होते. करोना विषाणूची ही लाट ओसरल्यानंतरही तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेत निर्बंध अद्याप पूर्णपणे उठवण्यात आलेले नाहीत. हे निर्बंध मंदिर दर्शनासाठीही लागू आहेत. मात्र अंगारक संकष्टी चतुर्थी निमित्त श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाकडून गणेशभक्तांसाठी खूशखबर देण्यात आली असून ऑनलाईन गणेश दर्शनाची (Siddhivinayak Online Darshan) सोय करण्यात आली आहे.

‘अंगारक संकष्टी चतुर्थी निमित्त श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने गणेशभक्तांना २४ तास ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था केली आहे. कोविड १९ संसर्ग निर्बंध नियमावली नुसार गणेशभक्तांनी मंदिरात प्रवेश न करता घरातूनच श्रीसिद्धिविनायकाचं दर्शन घ्यावं,’ अशी विनंती श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) आदेश बांदेकर यांनी केली आहे.

‘२७ जुलै रोजी मध्यरात्री साडेबार वाजल्यापासून गणेशभक्तांना ऑनलाईन दर्शन घेता येईल. यासाठी श्रीसिद्धिविनायक टेम्पल अ‍ॅप डाऊनलोड करावे आणि घरी राहून सुरक्षित दर्शन घ्यावे, मंदिर बंद असल्याने कोणीही मंदिर परिसरात गर्दी करू नये,’ असं आवाहनही आदेश बांदेकर यांनी केलं आहे.

दरम्यान, अनलॉक प्रक्रियेनंतर अनेक गोष्टींना मुभा दिल्यानंतरही मंदिर दर्शनाबाबत निर्बंध ठेवण्यात आल्याने भाजपकडून वारंवरा राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे. मात्र भाविकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं स्पष्टीकरण यापूर्वीच सरकारकडून देण्यात आलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here