रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांमध्ये आता मदतीचा पूर

– बेपत्ता व्यक्ती मृत घोषित

– स्वच्छतेच्या कामाला युद्धपातळीवर प्रारंभ

– पुन्हा सावरण्याचे काम सुरू

म. टा. वृत्तसेवा, अलिबाग/ रत्नागिरी

कोकणातील रायगड तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांच्या ठिकाणी सुरू असलेले बचावकार्य सोमवारी अखेर थांबवण्यात आले. रायगडमधील महाड तालुक्यातील तळीये गावातील दरडीखाली बेपत्ता असलेले ३१ जण तसेच रत्नागिरीमधील खेड तालुक्यात मौजे पोसरे धामणन बौद्धवाडी येथे बेपत्ता असलेले दोन जण यांना सोमवारी मृत घोषित करण्यात आले. चिपळूण, महाडसह महापुराचा तडाखा बसलेल्या भागांमध्ये आता स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर सुरू झाले असून मदतीचा ओघ सुरू झाला आहे.

तळीये येथे गुरुवार, २२ जुलै रोजी अतिवृष्टीमुळे दरड कोसळून संपूर्ण गाव दरडीखाली गाडले गेले होते. त्यापैकी ५३ जणांचे मृतदेह सापडले होते, तर ३१ जण बेपत्ता झाले होते. एनडीआरएफ, एचडीआरएफ, टीडीआरएफ बचाव तुकड्या दरडीखाली दबल्या गेलेल्यांचा शोध घेत होत्या. मात्र त्यांचा शोध लागला नाही. अखेर बेपत्ता व्यक्तींचे नातेवाईक व जखमींच्या भावना समजून घेतल्यानंतर, तसेच बचाव यंत्रणेच्या अभिप्राय मिळाल्यानंतर अधिकृतरित्या ३१ जणांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले असून शोधमोहीम थांबविण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. दरडीखालून कोणी जिवंत आढळून येईल, ही आशा मावळल्याने हा निर्णय घेण्यात आला.

त्यामुळे तळीये दरड दुर्घटनेतील मृतांचा आकडा ८४ वर पोहचला आहे. तर खेड तालुक्यात मौजे पोसरे धामणन बौद्धवाडी येथे दरडीखाली सापडलेल्या १७ जणांपैकी १५ जणांचे मृतदेह हाती लागले, तर उर्वरित दोघांना एनडीआरएफने, एसडीआरएफ, टीडीआरएफ यांनी अधिकृतरित्या मृत घोषित करून शोध मोहीम थांबवली.

पूरग्रस्त चिपळूमध्ये साफसफाईचे काम सुरू झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशांनुसार, पूरग्रस्त भागाची वेगाने स्वच्छता व्हावी, यासाठी बृहन्मुंबई महापालिकेची आधुनिक स्वच्छता यंत्रणा सोमवारी चिपळुणात दाखल झाली व स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. खेडमध्येही विविध खासगी व सरकारी यंत्रणांचा वापर करून स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here