अमरावती : अमरावती शहरातून हवालामार्फत मोठ्या रकमेची वाहतूक होत असल्याच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आज मंगळवारी पहाटे केलेल्या कारवाईत दोन स्कॉर्पियोमधून सुमारे सव्वातीन कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती अमरावती पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे.

हवालामार्फत शहरातून मोठ्या रकमेची वाहतूक होत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी शहरातील फरशी स्टॉप परिसरात नाकाबंदी केली होती. यावेळी दोन स्कॉर्पिओ गाड्यांमधून ही सुमारे सव्वातीन कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून अधिक पोलीस तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्कॉर्पिओमधून या मोठ्या रकमेची वाहतूक करणारे सहा नागरिक हे गुजराती येथील निवासी असल्याचे समजते. पोलिसांनी जप्त केलेल्या स्कॉर्पिओमध्ये पैसे ठेवण्यासाठी एका विशिष्ट प्रकारची जागा तयार करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. यासाठी दोन्ही स्कॉर्पिओ गाड्यांच्या मधल्या सीटच्या खाली एक खचका तयार करण्यात आला होता. लोखंडाच्या जाड पत्रा व नट बोल्ट याचा उपयोग करून ही जागा तयार करण्यात आली होती. वरवर पाहता कुणालाही शंका येणार नाही अशी व्यवस्था या दोन्ही स्कॉर्पिओमध्ये करण्यात आली होती.

दरम्यान, ही रक्कम मोजण्यासाठी तीन स्वयंचलित यंत्र कार्यान्वित करण्यात आले आहे. यासंदर्भात ट्रेझरी व इन्कम टॅक्स विभागाला माहिती देण्यात आली आहे पोलीस आयुक्त आरती सिंह व डीसीपी सातव यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची सविस्तर माहिती घेतली आहे. ठाणेदार मनीष ठाकरे या संपूर्ण तपासाची चौकशी करीत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here