नवी दिल्लीः अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला पोलिसांनी संध्याकाळी दिल्लीत आणलं. भारतीय गुप्तचर संस्था ‘रॉ’चे अधिकारी आणि कर्नाटक पोलिसांच्या पथकाने संयुक्तपणे केलेल्या कारवाईत रवी पुजारीला बेड्या ठोकण्यात आल्या. त्याला आफ्रिका खंडातील सेनेगल या देशात अटक करण्यात आली.

रवी पुजारीला कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. रवी पुजारी हा सेनेगलमध्ये एँटोनी फर्नांडिस नावाने राहत होता. फर्नांडिस नावाचा त्याचा पासपोर्ट १० जुलै २०१३ मध्ये बनवण्यात आला होता. हा पासपोर्ट जुलै २०२३पर्यंत वैध होता.

पासपोर्टनुसार रवी पुजारी हा कमर्शियल एटंज होता. म्हणजेच व्यावसायीक मान्यता त्याला मिळाली होती. सेनेगल, बुर्किना फासो या देशांत ‘नमस्ते इंडिया’ नावाने तो अनेक रेस्टॉरंट चालवत होता.

जून २०१९ मध्ये फरार झाला होता

रवी पुजारीला २१ जानेवारी २०१९ रोजी सेनेगलची राजधानी डकारमधील एका हेअर कटिंग सलूनधून अटक करण्यात आली होती. तेव्हापासून त्याला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान, कोर्टाकडून जामीन मिळाल्यानंतर जून २०१९ मध्ये तो फरार झाला होता. यानंतर पोलिसांना त्याचा सुगावा लागत नव्हता.

रवी पुजारीवर कर्नाटक, महाराष्ट्रात ९८ गुन्हे

रवी पुजारीवर मुंबई आणि कर्नाटकसह एकूण ९८ गुन्हा दाखल आहे. त्याने बॉलिवूड कलाकारांसह गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी यांनाही खंडणीसाठी धमकी दिली होती. मुंबई पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये पुजारीविरुद्ध ४९ गुन्ह्यांची नोंद आहे. त्यातील २६ गुन्हे मकोकाखाली दाखल झालेले आहेत. गुजरातमध्ये त्याच्याविरुद्ध खंडणी प्रकरणी ७५ गुन्ह्यांची नोंद आहे. गेल्या दोन दशकांपासून पुजारी भारताला गुंगारा देत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here