मुंबई: भारताचे पहिले पंतप्रधान यांच्याबद्दल राज्यपाल यांनी केलेल्या एका विधानामुळं वाद निर्माण झाला आहे. कोश्यारी यांच्या वक्तव्याचा काँग्रेसनं निषेध केला असून त्यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी केली आहे. ‘भगतसिंह कोश्यारी यांना राजकारणाची एवढीच खुमखुमी असेल तर त्यांनी राज्यपालपदाचा राजीनामा द्यावा,’ असं काँग्रेसनं सुनावलं आहे.

कारगिल विजय दिनाच्या निमित्तानं राजभवनात आयोजित एका कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारी यांनी देशाच्या सुरक्षेच्या धोरणाविषयी बोलताना स्वातंत्र्यानंतरच्या काँग्रेस सरकारांवर टीका केली होती. अटलबिहारी वाजपेयी यांच्या आधीच्या सरकारांनी देशाच्या सुरक्षेकडं म्हणावं इतकं लक्ष दिलं नाही. पंडित नेहरू हे मोठे नेते होते. त्यांचं योगदान मोठं आहे. पण त्यांची एक कमजोरी होती. ते ‘शांतीदूत’ या प्रतिमेत अडकले. शांततेची कबुतरं उडवण्यात ते मग्न राहिले. त्याचा परिणाम देशाच्या सुरक्षेवर झाला. सुरक्षेच्या बाबतीत देश कमकुवत राहिला. प्रदीर्घ काळ हे चालत राहिले,’ असं कोश्यारी म्हणाले होते.

वाचा:

कोश्यारी यांच्या या वक्तव्याचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी जोरदार समाचार घेतला आहे. ‘कोश्यारी यांनी नेहरुंच्या ‘शांतीदूत’ प्रतिमेवरून केलेले विधान हे चुकीचे व निषेधार्ह आहे. शांततेचा पुरस्कार करणे म्हणजे कमकुवतपणा नसतो, त्यासाठी मौठे धैर्य लागते. देशाची ७० वर्षांत झालेली प्रगती तसेत भारत स्वातंत्र्यानंतर आत्मनिर्भर म्हणून जगात ताठ मानेने उभा राहिला तो नेहरु यांच्या सक्षम, कणखर नेतृत्वामुळेच. परंतु पंडित नेहरुंचा द्वेष करण्याचे संस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दिले जातात, तो नेहरु द्वेषच राज्यपालांच्या बोलण्यातून व्यक्त झाला आहे, असं पटोले म्हणाले.

‘राज्यपाल म्हणून जी कार्य करायची आहेत, ती सोडून कोश्यारी इतर कार्यातच जास्त रस घेताना दिसतात. राज्यपाल हा कोणत्याही एका पक्षाचा नसतो. तो राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो. परंतु कोश्यारी यांनी राजभवनला भाजपचं कार्यालयच बनवलं आहे. ते नेहमी सरकारविरोधात आणि भाजपाधार्जिणे काम करत आले आहेत. कोश्यारी यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार झालेले आहेत, राज्यपाल पदावर असतानाही ते या संस्कारांतून बाहेर आलेले दिसत नाहीत. राज्यपालपद हे प्रतिष्ठेचे पद आहे. त्या पदावर असलेल्या व्यक्तीने राजकीय अभिनिवेष बाजूला ठेवला पाहिजे परंतु त्यांच्या वर्तनातून ते दिसत नाही. उलट त्यांचे वर्तन हे राज्यपालपदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवणारे आहे,’ असा हल्लाबोल पटोले यांनी केला.

वाचा:

‘पंडित नेहरु ते डॉ. मनमोहनसिंह यांच्या दूरदर्शी, सक्षम नेतृत्वामुळेच देश उभा राहिला आहे. वाजपेयी सरकारच्या आधीच देशानं अणु कार्यक्रमाची पायाभरणी केली होती. देश स्वतंत्र झाला तेव्हा आपली लष्करी ताकद किती होती आणि त्यानंतर काँग्रेस सरकारच्या काळात देश लष्कराच्या बाबतीत सामर्थ्यवान बनला हे त्यांना दिसलं नाही. अमेरिका व रशिया या बलाढ्य शक्तींना न जुमानता भारतानं अणु कार्यक्रम राबविले. इंदिरा गांधींच्या सक्षम नेतृत्वाने पाकिस्तानचे दोन तुकडे केले. पहिला अणुस्फोट इंदिरा गांधी यांच्या काळात झाला. हे कोश्यारी यांना माहीत नाही का? अटलबिहारी वाजपेयी यांनीही पाकिस्तानबरोबर शांतीवार्ता सुरू केली होती. वाजपेयी पाकिस्तानबरोबर शांतीवार्ता करत असतानाच पाकिस्ताननं कारगिल युद्ध घडवून आणलं, मग वाजपेयी यांच्या शांततेच्या वाटाघाटी कमकुवतपणाचं लक्षण म्हणायचं का? नरेंद्र मोदी सरकारच्या काळात पाकिस्ताननं वारंवार सीमेवर हल्ले केले, पुलवामा हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले. पाकिस्तानी कुरापती करत असतानाही नरेंद्र मोदी अनाहूतपणे पंतप्रधान नवाज शरिफ यांच्या वाढदिवसाला पाकिस्तानात जाऊन भेटले तेही कमुवतपणाचे लक्षणच म्हणायचं का?,’ असा सवालही त्यांनी केला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here