: कोयना धरणाच्या पट्ट्यातील दरडग्रस्त मीरगाव, आंबेघर, हुम्बराळे गावाचे कायमस्वरुपी पुनर्वसन जलसंपदा विभागाच्या वसाहतीमध्ये करण्याचे निर्देश नगरविकास मंत्री यांनी स्थानिक प्रशासनाला दिले. एकनाथ शिंदे यांनी आज स्वतः जाऊन या जलसंपदा विभागाच्या निवासी वसाहतींची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी या वसाहतींच्या डागडुजीचे काम वेगाने पूर्ण करून त्यात या १५० कुटुंबांचे स्थलांतर करण्याचे निर्देश दिले.

गेल्या काही दिवसात राज्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील कोयनानगर परिसराला देखील बसला. या परिसरातील मीरगाव, आंबेघर, हुम्बराळे गावात दरड कोसळल्याने ३० जणांना आपला जीव गमवावा लागला होता. नगरविकास मंत्र्यांनी तातडीने इथे येऊन मीरगाव आणि हुम्बराळे या गावांना भेटी देऊन येथील परिस्थितीची पाहणी केली. या गावकऱ्यांचे एमटीडीसीच्या पर्यटन रिसॉर्ट आणि कोयनानगर जिल्ह्यापरिषद शाळेत तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले आहे.

एकनाथ शिंदे यांनी या ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला. या कठीण प्रसंगात शासन पूर्णपणे तुमच्यासोबत असून तुमच्या पुनर्वसनाबाबत लवकरच कायमस्वरूपी तोडगा काढू अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली. त्यासोबतच या ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तू, चादरी, कपडे, सतरंज्या, चटया, छत्र्या अशी मदत दिली. तसंच शासनाची मदत देखील तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचवली जाईल असंही त्यांनी सांगितले.

यानंतर या ग्रामस्थांचे कायमस्वरूपी पुनर्वसन जलसंपदा विभागाच्या वसाहतीत करण्याचा पर्याय पुढे आला. कोयनानगर परिसरातील या वसाहती कोयना धरण बांधताना उभारण्यात आल्या होत्या. आज त्यांची अवस्था दयनीय आहे. मात्र या वसाहतींची डागडुजी केल्यास तो पुनर्वसनासाठी एक चांगला पर्याय ठरू शकेल यावर एकमत झाल्याने एकनाथ शिंदे यांनी तातडीने हे डागडुजीचे काम हाती घेण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच या दरडग्रस्त गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी बृहद आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याने ते देखील लवकरच करू असे ग्रामस्थांशी बोलताना स्पष्ट केले.

दरम्यान, यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, ठाण्याहून पूरग्रस्तांसाठी मदत घेऊन आलेले नगरसेवक राम रेपाळे, नगरसेवक योगेश जानकर, शशिकांत जाधव आणि स्थानिक अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here